मुंबई : पंजाब नॅशनल बँक प्रकरणातील फरारी आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सी याने सीबीआयने दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका आणि त्यासह जोडलेली कागदपत्रे गहाळ झाल्याची तसेच ती सापडत नसल्याचे चोक्सी याच्या वकिलांनी गुरुवारी उच्च न्यायालयात सांगितले. त्यावर एवढ्या १मौल्यवान१ अशिलाची याचिका गहाळ करण्याची जोखीम तुम्ही कशी घेऊ शकता ? अशी मिश्किल टिप्पणी न्यायालयाने करताच न्यायदालनात हशा पिकला.
हेही वाचा >>> मुंबई: कांदिवली औद्योगिक संकुलाला उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
न्यायालयाने एवढ्यावरच न थांबता चोक्सी कुठे आहे ? असा प्रश्न चोक्सी याच्या वकिलाला केला असता त्यावर तो ‘अँटिग्वा’ येथे असल्याचे उत्तर दिले, तर सीबीआयने तो फरारी असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर सीबीआयलाही चोक्सी हा ‘अँटिग्वा’ येथे असल्याचे माहीत आहे, असे त्याच्या वकिलाने म्हटले. चोक्सी याने २०१९ मध्ये सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका केली होती. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर चोक्सी याची ही याचिका गुरूवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीनंतर आपले कार्यालय अन्यत्र हलवण्यात आले.
हेही वाचा >>> मुंबई: महारेराच्या पाठपुराव्यामुळे विकासकांकडून १०० कोटींच्या आदेशाची वसुली
यामध्ये चोक्सी याने केलेली मूळ याचिका आणि त्यासह जोडण्यात आलेली कागदपत्रे गहाळ झाली. शोधूनही ती सापडत नसल्याचे चोक्सी याचे वकील राहुल अग्रवाल यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच नव्याने याचिका तयार करण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली. त्यावर चोक्सी याच्या याचिकेची प्रत तुमच्याकडे आहे का? अशी विचारणा न्यायालयाने सीबीआयची बाजू मांडणारे वकील हितेन वेणेगावकर यांच्याकडे केली. त्यावेळी आपल्याला याचिकेची प्रत उपलब्ध करून दिली नसल्याचे न्यायालयाला सांगितले. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने अग्रवाल यांना नव्याने याचिका तयार करण्यासाठी एक दिवसाचा वेळ देण्याचे स्पष्ट केले. तेव्हा आपण याचिकेची प्रत शोधण्यासाठी महाराष्ट्र अधिवक्ता कार्यालयातही गेल्याचे आणि त्यांच्याकडेही याचिकेची प्रत उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच याचिका नव्याने तयार करण्यासाठी जास्त मुदत देण्याची विनंती केली. त्यावर चोक्सीसारख्या अशिलाने दाखल केलेली कागदपत्रे गहाळ करण्याची जोखीम तुम्ही कशी घेऊ शकता ? असा प्रश्न अग्रवाल यांना विचारला. त्यानंतर चोक्सी कुठे आहे? या न्यायालयाच्या प्रश्नावरूनही अग्रवाल आणि वेणेगावकर यांच्यात वाद झाला. चोक्सी अँटिग्वा येथे असल्याचे अग्रवाल सांगत होते, तर चोक्सी हा फरारी आर्थिक गुन्हेगार असल्याचे सीबीआयकडून सांगितले गेले.