मुंबई : तरुणाईला आकर्षण असलेल्या ‘कोल्ड प्ले’ या जगप्रसिद्ध ब्रिटिश वाद्यवृंदाचा कार्यक्रम जानेवारी २०२५ मध्ये भारतात होणार असून नवी मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीकडे तरुणाईचे लक्ष लागले होते. अखेर रविवार, २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन तिकीट विक्रीला सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटांत सर्व तिकिटे आरक्षित (बुकिंग) झाली. त्यानंतर ऑनलाईन तिकीट विक्रीचे संकेतस्थळ ठप्प (क्रॅश) झाल्यामुळे अनेकांना तिकीट मिळाले नाही. त्यामुळे तरुणाईमध्ये निराशेचे वातावरण पसरले आणि त्यांनी समाजमाध्यमांवर मोर्चा वळवून आपली निराशा विनोदाच्या माध्यमातून व्यक्त केली.

‘कोल्ड प्ले’संदर्भातील मीम्स आणि रिल्सचा पाऊस रविवारी दिवसभर समाजमाध्यमांवर पडत होता. ‘कोल्ड प्ले’ या ब्रिटिश वाद्यवृंदाचा ‘म्युझिक ऑफ द स्फेअर्स – वर्ल्ड टूर’अंतर्गत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर १८, १९ आणि २१ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम होणार आहे. या तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमाची ऑनलाईन तिकीट विक्री ही रविवार, २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र क्षणार्धात सर्व तिकिटे विकली गेली आणि ऑनलाईन तिकीट विक्री करणारे संकेतस्थळही ठप्प झाले. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून तिकिटांकडे आस लावून बसलेल्या तरुणाईची तिकीट पदरी न पडल्यामुळे घोर निराशा झाली.

हेही वाचा – मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : नवीन तारीख मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी धावपळ, प्रचाराची रणधुमाळी शिगेला

भारतात होणाऱ्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार याची कल्पना असल्यामुळे ‘कोल्ड प्ले’ आणि ऑनलाईन तिकीट विक्री संकेतस्थळाने तिकिटांचे विशेष नियोजन केले पाहिजे होते, असे मतही तरुणाईने व्यक्त केले. तसेच व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमांवर आपला मोर्चा वळवला आणि टीकास्त्र सोडण्यासह विनोदी मीम्स, रिल्स, स्टोरी, स्टेटस आणि पोस्टच्या माध्यमातून आपली निराशाही व्यक्त केली. तिकीटे न मिळाल्यामुळे निराशेच्या भरात पण विनोदी ढंगात ‘कोल्ड प्ले’ या ब्रिटिश वाद्यवृंदाची विविध भारतीय वाद्यवृदांशी तुलना करायला सुरुवात केली आणि भारतीय वाद्यवृंदाचे कार्यक्रम पाहायला जाण्याचेही नियोजन केले.

ज्यांना ऑनलाईन तिकीट विक्री संकेतस्थळावरून तिकीट मिळाले, त्यापैकी काहींनी अधिक किंमतीत ऑफलाईन पद्धतीने तिकीटे विकायला सुरुवात केली. या तिकिटांची किंमत ५० हजार ते १ लाखांहून अधिकपर्यंत सांगण्यात येत होती. यासंदर्भातील काही मेसेज व स्क्रीनशॉट्स समाजमाध्यमांवर फिरत होते. नवी मुंबईत होणाऱ्या ‘कोल्ड प्ले’ या ब्रिटिश वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाच्या तिकिटांची किंमत ही वेगवेगळी आहे. या कार्यक्रमाच्या तिकिटांची किमान किंमत ही २ हजार ५०० रुपये तर कमाल किंमत ही तब्बल ३५ हजार रुपये आहे. व्यासपीठ आणि आसनव्यवस्थेमधील अंतर तसेच इतर सोयीसुविधांनुसार तिकिटांची वेगवेगळी किंमत आहे. ‘कोल्ड प्ले’ या कार्यक्रमाच्या तिकिटांची रक्कम ही २ हजार ५००, ३ हजार ५००, ४ हजार, ४ हजार ५००, ६ हजार ४५०, ९ हजार, १२ हजार ५०० आणि तब्बल ३५ हजार इतकी आहे.

हेही वाचा – मुंबईत सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज

३५ हजार रुपयांच्या तिकिटांत कोणकोणत्या सुविधा?

‘कोल्ड प्ले’ या ब्रिटिश वाद्यवृंदाच्या नवी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाचे ३५ हजार रुपयांचे तिकीट घेणाऱ्या प्रेक्षकांना विशेष सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. ‘लाऊंज’ स्वरूपातील हे तिकीट असून विशेष आसनव्यवस्था आहे. जेवण व शीतपेये, कार्यक्रम पाहण्यासाठी विशेष कक्ष, कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी स्टेडियममध्ये विशेष प्रवेशव्दार, आराम कक्ष आणि प्रसाधनगृहे, वाहनतळ, वातानुकूलित परिसर अशा सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत.