ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरचा निरोप देण्यात आला, तेथेच त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सोमवारी येथे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचा पुतळा व्हावा, असा प्रस्ताव शिवसेनेकडून राज्य सरकारकडे दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बाळासाहेबांचे आणि शिवतीर्थाचे नाते तब्बल चार दशकांचे. शिवसेनेच्या स्थापनेची सभा तेथे झाली, दसरा मेळावे आणि अनेक सभा झाल्या. शिवतीर्थाने शिवसेनेच्या कारकीर्दीतील अनेक चढउतार पाहिेले. तेथेच बाळासाहेबांना अंतिम निरोप देण्यात आला. हे अतूट नाते चिरंतन रहावे, यासाठी हे स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावे. त्यासाठी तीच जागा सर्वात योग्य आहे, असे जोशी यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले. बाळासाहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होते. आयुष्यभर ते शिवशाहीसाठी स्थापनेसाठी झटले, शिवरायांची शिकवण आचरणात आणली. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचा पुतळा उभारला जावा. सरकारने स्मारकासाठी परवानगी द्यावी. ते उभारण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू, असे जोशी यांनी नमूद केले.
भाजपचा पाठिंबा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवर व्हावे, या मागणीला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. स्मारकासाठी जागा दिल्याने क्रीडांगणाची किंवा उद्यानाची जागा कमी होईल, अशी चिंता लोकांनी करू नये, असे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
सचिनने घेतली ठाकरे कुटुंबीयांची भेट
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सोमवारी रात्री उशीरा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली.
अहमदाबाद मध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यामुळे सचिन बाळासाहेबांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकला नव्हता. त्यामुळे रविवारी अहमदाबादहून आल्यानंतर तो थेट मातोश्रीवर पोहचला. यावेळी त्याने उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
‘साहेबांचे स्मारक तेथेच व्हावे!’
ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरचा निरोप देण्यात आला, तेथेच त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सोमवारी येथे सांगितले.
First published on: 20-11-2012 at 04:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memorial of balasaheb should on that sport