शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे यासाठी शिवसेना आग्रही असली तरी कायदेशीर अडचणीमुळे हिरवळरूपी स्मारकही उभारणे शक्य होणार नाही, असे महापालिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. मैदानावर मैदानाचे स्वरूप बदलणारी कोणतीही गोष्ट करता येणार नाही, या उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिवाजी पार्कवर हिरवळ व मातीचा उंचवटा असलेले स्मारक उभारण्याची शिवसेनेची मागणी मान्य करता येणार नाही, असेही हा अधिकारी म्हणाला, तर आयुक्त सीताराम कुंटे यांनी एक महिना उलटल्यानंतरही या प्रस्तावाबाबत अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. शिवसेनेची स्मारकाची मागणी मान्य केल्यास उद्या अन्य कोणी मागणी केली तर काय करायचे, असाही प्रश्न आयुक्तांपुढे आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसापूर्वी म्हणजे २३ जानेवारीपूर्वी शिवाजी पार्क येथे त्यांचे उद्यानरूपी स्मारक करण्याची शिवसेनेची तयारी असून महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर मांडला जावा यासाठी सेनेचे नेते आग्रही आहेत. यासाठी महापौर सुनील प्रभू यांच्या दालनात गटनेत्यांच्या बैठकीत स्मारकाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. गटनेत्यांच्या बैठकीला पालिका कायद्यानुसार कोणतीही वैधता नसल्यामुळे तेथे मंजूर झालेल्या ठरावालाही कायदेशीर अधिष्ठान नाही. मात्र सेनेकडून होत असलेल्या आग्रहाच्या पाश्र्वभूमीवर पालिका आयुक्त कुंटे यांनी विकास नियंत्रण नियमावलीसह विविध कायदेशीर बाबी तपासण्यास सुरुवात केली. यात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती लोढा यांनी मैदानांसंदर्भात दिलेल्या एका निकालात मैदानाचे स्वरूप कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही, या आदेशामुळे बाळासाहेबांसाठी अपवाद करून हिरवळरूपी स्मारकाला कशी परवानगी द्यायची असा पेच निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे उद्या अन्य कोणत्या पक्षाने अथवा संस्थेने अशी हिरवळ लावण्याची मागणी केल्यास काय करायचे, असा मुद्दा उपस्थित झाल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्काराची जागा शिवसेनेने मोकळी करून दिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारील मोकळ्या जागेवर चाळीस बाय वीस फुटांचे उद्यान बनविण्याची शिवसेनेची योजना आहे. मध्यंतरी या जागेवर सेनेच्या काही उत्साही मंडळींकडून पूजा करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर ही मोकळी जागा लाकडी खांब व पत्रे लावून पालिकेने बंदिस्त केली असून येथे कोणत्याही प्रकारचे उद्यान पालिकेच्या परवानगीशिवाय करण्याचा प्रयत्न झाल्यास तो अनधिकृत असेल व त्यावर कारवाई केली जाईल, असे आयुक्त कुंटे यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेबांच्या स्मारकाची शक्यता धूसर!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे यासाठी शिवसेना आग्रही असली तरी कायदेशीर अडचणीमुळे हिरवळरूपी स्मारकही उभारणे शक्य होणार नाही, असे महापालिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. मैदानावर मैदानाचे स्वरूप बदलणारी कोणतीही गोष्ट करता येणार नाही
First published on: 07-01-2013 at 02:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Memorial of balasaheb thackeray at shivaji park has no possibility