दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्दय़ावरून बुधवारच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्त आर. ए. राजीव यांच्यामध्ये खडाजंगी झाली. या स्मारकाविषयी महापालिकेचे अधिकारी फारसे गंभीर नाहीत, असा आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी करताच आयुक्त राजीव यांनी त्याला जोरदार प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्यांच्यात खडाजंगी झाली. तसेच या प्रकरणामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी थेट महापौर हरिश्चंद्र पाटील यांना धारेवर धरले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ठाण्यामध्ये त्यांचे स्मारक उभारण्याचा धोरणात्मक निर्णय सर्व साधारण सभेत घेण्यात आला होता. मात्र, गेल्या अडिच महिन्यांपासून त्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याचे शिवसेना सदस्यांचे म्हणणे आहे. मध्यंतरी, शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा ठरावाची फाईल गाहाळ झाल्यावरून सर्व साधारण सभेत वादंग झाला होता. ठाण्यामध्ये शिवसेनेची गेली अनेक वर्षे सत्ता असतानाही शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाविषयी वेळकाढूपणा धोरण अवलंबले जात आहे, अशी भावना शिवसेना नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटामध्ये आहे. त्याचेच पडसाद बुधवारी सभागृहात उमटले. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाविषयी चुकीची माहिती उपलब्ध होत असल्याने महापालिका प्रशासनाने त्याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली. तसेच या स्मारकाविषयी काही अधिकाऱ्यांकडून जाणूनबुजून वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर, आयुक्त राजीव यांनी प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला तसेच आवाज चढवून बोलू नये, असा सल्ला त्यांनी म्हस्के
यांना दिला. त्यावरून म्हस्के आणि आयुक्त यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसेना सदस्यांनी थेट महापौर हरिश्चंद्र पाटील यांना धारेवर धरले असता, त्यांनी बाळासाहेबांचे स्मारकविषयी स्पष्टीकरण दिल्यानंतर सदस्य शांत झाले.
बीएसयुपी योजनेत मोफत घरे ? महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या बीएसयुपी योजनेमध्ये लाभार्थीना मोफत घरे देण्यासंबंधीचा सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात आला असून हा ठराव आता राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविल्यानंतरच या योजनेमध्ये मोफत घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
वॉटरफ्रन्ट डेव्हलप्मेंट प्रकल्प..
ठाणे महापालिका क्षेत्रातील वॉटरफ्रन्ट डेव्हलप्मेंट प्रकल्पातील झोन-१ मधील खाडीलगत असलेल्या सिडको बस स्टॉप ते कळवा पुलापर्यंत जुन्या सिटी सेंटरचा पुर्नविकास पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून
करण्याकरीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. या संबंधीचा प्रस्तावामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे सर्व सदस्यांनी प्रस्ताव तहकुब ठेवला आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था..
ट्राम (एलआरटी) या सार्वजनिक वाहतूकीसाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून निविदासंबंधी कागदपत्रे तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर निविदा मागविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला होता. त्यास सर्व पक्षीय सदस्यांनी मान्यता दिली.

Story img Loader