गेल्या ६५ वर्षांपासून पाडगावकरांनी निरंतर लिखाण केले. त्यांची कविता एकाच प्रकारची नाही; तर गीतात्मसुद्धा आहे आणि त्यांनी गाणीसुद्धा लिहिली आहेत. गाण्यातसुद्धा सामान्य भाषेत लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून बोलगाणी त्यांनी लिहिली. पाडगावकरांनी उत्कृष्ट अनुवादही केले आहेत. मुख्यत: असे दिसून येते की, पाडगावकरांवर बा. भ. बोरकर व कुसुमाग्रज यांचे संस्कार होते. बोरकरांची कविता गीतात्म होती, तर कुसुमाग्रजांच्या कवितेत सामाजिक, राजकीय भाष्य होते. या दोन्ही गोष्टी पाडगावकरांच्या कवितेत प्रतिबिंबित झाल्या. त्यांचे अनुकरण किंवा नक्कल पाडगावकरांनी केली नाही, तर त्यांचे संस्कार पाडगावकरांवर झाले. त्यांच्या ‘जिप्सी’ या काव्यसंग्रहातील ‘एक जिप्सी आहे माझ्या मनात..’ ही ओळ अतिशय प्रसिद्ध आहे. एकीकडे ही प्रसिद्ध ओळ लिहिणाऱ्या पाडगावकरांनी ‘विदूषक’ या कवितासंग्रहात अतिशय तिखट, उपरोध, उपहासयुक्त राजकीय भाष्य केले आहे. पुढे त्यांना ‘सलाम’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आपल्या अवतीभवतीच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी यात अतिशय कोरडे ओढले. या दोन्ही प्रवृत्ती पाडगावकरांमध्ये आहेत.
एकीकडे ‘शुक्रतारा मंद वारा..’, ‘श्रावणात घननिळा बरसला..’ यांसारखी मधुर गाणी एका बाजूला आहेत आणि दुसरीकडे त्यांची सामाजिक, राजकीय भाष्य करणारी कविता आहे. त्यामुळे त्यांची कविता कधीही शिळी झाली नाही. त्यांच्या प्रतिभेला सतत नवनवे उन्मेष फुटत गेले. वेगवेगळ्या बाजाची कविता त्यांनी लिहिली. असा कवी आपण विरळाच मानला पाहिजे. पाडगावकर त्यांच्या काळातल्या कवींमध्ये या वेगळेपणामुळेच अधिक उठून दिसतात. कवितेविषयी पाडगावकरांना मनातूनच अतिशय प्रेम होते. त्यामुळे नव्या पिढीच्या कविताही ते वाचत होते. आवर्जून त्यांच्याशी बोलत होते किंवा त्यांना लिहीत होते. खासगीत सांगायचे झाले तर माझ्या एका कवितासंग्रहातील कवितांची निवड त्यांनीच केली. त्यांचा आणि माझा अनुबंध याहीप्रकारे आहे. मी त्यांच्यासारखा लिहीत नाही, पण पाडगावकरांना वेगवेगळ्या कविता लिहिणारे कवी आवडत होते. एवढी रसिकता त्यांच्यात होती. नव्या पिढीच्या कवितांनासुद्धा आपण दाद दिली पाहिजे, ही वृत्ती त्यांच्यात होती. त्यामुळे सर्वच पिढीतल्या कवींना ते आदरणीय होते यात शंका नाही. अलीकडच्या काळात शेक्सपिअरच्या नाटकांचे अनुवाद त्यांनी केले. बायबलचा अनुवाद केला. नंतर इंग्रजीतील महाभारताचा मराठी अनुवाद त्यांनी केला. पाडगावकर हा कवी, लेखक सतत लिहीत राहिला.
कविता, गाणी यांखेरीज आणखी काही काम आपल्या भाषेसाठी ते करत राहिले. त्यामुळे कविमनावर ते कायम अधिराज्य गाजवत राहिले. आमच्यासारख्या कवींची रसिकता भिन्न असेल, त्यांच्या सर्वच कविता आवडतील असेही नाही. त्यांची विदूषक, सलाम ही कविता मला अधिक भावली. रोमँटिक वळणाची कविता मात्र तितकी रुचली नाही. तरीही त्यांनी कवितेसाठी, भाषेसाठी काम केले हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच ते आदरणीय आहेत.
त्यांची पिढी ही दिग्गज लोकांची पिढी होती. मराठीत १९४५ सालापासून मुक्तिबोध, पाडगावकर, करंदीकर, बापट यांसारखे दिग्गज होते. त्यातला महत्त्वाचा कवी आज गेला. ही पिढीच आता डोळ्यासमोरून नाहीशी झाली, पण कवींचे मरण शारीरिक झाले असले तरीही कवितेच्या रूपाने ते जिवंत आहेत. त्यांच्या कवितेत अजूनही ताजेपणा आहे. मराठी कवींनी हेवा करावा, अशा रसिकांचे प्रेम त्यांना मिळाले. त्यांची कविता चिरंजीव आहे, ताजी आहे. एका कवीला इतके प्रेम मिळाले ही गोष्टसुद्धा पाडगावकरांच्या बाबतीतच सांगावी लागेल. मराठी कवितेच्या इतिहासात पाडगावकरांचे कवी म्हणून जे काम आहे ते महत्त्वाचे, पण लौकिक जगात कवीचा बाणा, उदार वृत्ती त्यांच्यात होती हेही विशेष!
माणूस म्हणून त्यांचे बोलणे मिस्कील, कोपरखळी मारणारे होते. आपण नाउमेद होऊ नये यासाठी ते जपत होते. अतिशय मनमोकळेपणा त्यांच्यात होता, पण त्याचबरोबर एखादी गोष्ट आवडली नाही तर ते सांगण्याची वृत्ती त्यांच्यात होती. मागच्या पिढीतल्या कवींमध्ये प्रतिभेचे देणे होते, मंगेश पाडगावकर त्यांच्यापैकीच एक!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा