कवितेवर निरलस प्रेम करणारा कवी, असेच मंगेश पाडगावकर यांचे वर्णन करता येते. माझी आणि त्यांची क्वचित एक-दोनदा भेट झाली. माझा जन्मदेखील झाला नव्हता, त्याच्या दोन दशके आधीपासून ते कविता करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी परिचय होता असे काही मी म्हणणार नाही, पण अनेक कवींबरोबर आंतरिक स्नेह असतो तसाच माझा पाडगावकर यांच्याशी आंतरिक स्नेह होता. कविता ही कवीपेक्षाही मोठी असते असे मानणाऱ्यांपैकी पाडगावकर हे एक कवी होते.
विद्यार्थी असताना पाठय़पुस्तकातून पाडगावकरांची कविता भेटली. नंतरच्या काळात पाडगावकरांची गाणी ऐकत ऐकतच लहानाचा मोठा झालो. कविता या साहित्यप्रकाराचा छंद जडला तेव्हा त्यांच्या कविता वाचू लागलो. जिप्सी, छोरी, विदूषक, सलाम, बोलगाणी हे कवितासंग्रह वाचून काढले; नव्हे त्यांची पारायणे केली. काव्याचे वेगवेगळे प्रकार हाताळणाऱ्या पाडगावकर यांनी आपली कविता कधी साचेबद्ध होऊ दिली नाही. जीवनाकडे कुतूहलाने पाहण्याची आणि आस्वाद घेण्याची पाडगावकरांची वृत्ती त्यामागे आहे. आम्ही लिहितो तीच कविता असाही एक प्रवाह मध्यंतरीच्या काळामध्ये आला होता. पण, सर्वार्थाने ज्येष्ठ असूनही पाडगावकर कधी हटवादी नव्हते. त्यांच्यामध्ये एक खोडकर मूल आणि मिस्कील स्वभावाचा माणूस दडला होता. कवितेवर भरभरून प्रेम केल्यामुळेच त्यांचा काव्याचा प्रवाह हा सतत खळाळत होता.
कवितेमध्ये अभिसरण होणे गरजेचे असते. काव्याच्या मांडणीमध्ये सतत नवनवे प्रयोग करीत त्यांनी कविता या माध्यमाच्या सर्व शक्यतांची दालने उघडली. त्यामुळेच ‘त्यानं प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं, करू दे की, मला सांगा त्यामध्ये तुमचं काय गेलं’, असे गाणे लिहिणारे पाडगावकर ‘सलाम’ कवितेतून समाजव्यवस्थेवर परखड भाष्य करू शकतात. जे सुचते ते असे निर्भीडपणे लिहिणे महत्त्वाचे असते. ज्या काळामध्ये िवदा-बापट-पाडगावकर या त्रयीचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम होत होता तेव्हा मी लहान असल्यामुळे मला तो पाहता आला नाही. हा कार्यक्रम पाहता आला असता तर मला कविता सादरीकरणासाठी तो अभ्यास म्हणून उपयुक्त ठरला असता. कविता मंचावरून सादर होणे हा त्या कवितेचा पुनर्जन्मच असतो. काव्यवाचनाची प्रथा अनुभूतीने जोपासत पाडगावकर यांनी कवितेला रसिकांच्या हृदयात स्थान मिळवून दिले. ‘आयुष्यावर बोलू काही’ला यश मिळते त्यामागे त्यांची पुण्याई आहे.
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या पाडगावकरांच्या कवितेचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे. त्यातूनच मी ‘लव्हलेटर’ हे विडंबन केले. ही कविता सादर करताना मी ते आवर्जून सांगतो. एका कार्यक्रमात मुद्दाम पाडगावकर यांच्यासमोरच मी ही कविता सादर केली तेव्हा त्यांनी कुतूहलाने कविता ऐकली होती. काव्याचा आस्वादक, कवितेचा प्रेमी आणि नव्या कवींनाही फुलण्यासाठी मार्गदर्शन करणारे कवितेचे झाडच उन्मळून पडले आहे.