अत्यंत सोप्या शब्दांत भावनांचा आविष्कार घडवण्यात मंगेश पाडगावकर यांचा हातखंडा होता. आकाशवाणीवर मी संगीत विभागात कार्यरत होतो. त्या वेळी त्यांनी लिहिलेल्या ‘राधा’ नावाच्या सांगीतिकेला मी संगीत दिलं होतं. त्यानंतरही त्यांच्या अनेक सांगीतिका, गाणी संगीतबद्ध केली. त्यांच्या वात्रटिकांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी खुदकनिका लिहिल्या. शब्दप्रधान गायकीचा माझा आग्रह सर्वश्रुत आहे. पण पाडगांवकरांचे शब्द चाल बरोबर घेऊनच येत होते.
– यशवंत देव
पाडगावकरांच्या जाण्याने मागच्या पिढीच्या कवींमधील शेवटचा कवी आपल्यातून निघून गेला आहे. विद्यापीठीय वर्तुळापासून ते सामान्य लोकांपर्यंत त्यांच्या कविता पोहचल्या आहेत. सर्वाच्या मनाला भावेल अशी कविता लिहिणारे पाडगावकर हे लोककवीच होते. त्यांची कविता ही वाचकाला एक प्रकारची आशा देणारी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची ऊर्जा व उत्साह नेहमीच जाणवत असे. तरुण कवी-लेखकांना ते नेहमीच प्रोत्साहन देत असत. त्यांच्या जिप्सी, छोरी या कविता मला फार भावलेल्या आहेत. त्यातून सृजनाची प्रक्रिया व कलंदरपणा यांचे वर्णन आले आहे, ते महत्त्वाचे वाटते. ते सर्वाना आपल्यात सामावून घेत असत.
– नीरजा
पाडगावकरांबरोबर मी आमच्या ‘जीवनगाणी’ संस्थेकडून महाराष्ट्रात व देशाबाहेरही सुमारे ३५०च्या वर कार्यक्रम केले आहेत. ‘माझे जीवनगाणे’ हा आमचा कार्यक्रम पाडगावकर त्यांच्या कवितांनी, मुलाखतींनी, वेगवेगळ्या किश्शांनी फारच खुलवत असत. ‘आजचा दिवस आपला आहे, या भावनेनेच जीवन जगत राहा’, हा त्यांनी दिलेला सल्ला मी नेहमीच पाळत आलो आहे. – प्रसाद महाडकर
पाडगावकरांचे निधन हा मराठी कवितेसाठी फार मोठा धक्का आहे. त्यांच्या जाण्यामुळे मराठी कवितेतील जुनी पिढी व नवी पिढी यांना जोडणारा दुवाच आपल्यातून निघून गेला आहे. एकदा उल्हासनगरला आम्ही कार्यक्रम करीत होतो. त्यात दिवस तुझे हे फुलायचे.. हे त्यांचे गाणे उपस्थित हजार प्रेक्षकांनी एकत्र पाठ म्हणून दाखवले होते. इतक्या त्यांच्या कविता जनमानसाला आपल्या वाटतात.
– अरुण म्हात्रे

अनेक अजरामर गाण्यांचे गीतकार आणि अत्यंत साध्या व लाघवी व्यक्तिमत्त्वाचे धनी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या दु:खद निधनाची बातमी ऐकून मला अतिशय दु:ख झाले. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
– लता मंगेशकर