मुंबई : देशातील निवासी डॉक्टरांच्या मानसिक छळाबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रीय स्तरावर मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. डेहराडून येथील एसजीआरआर वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागातील प्रथम वर्षाच्या निवासी डॉक्टरांच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा अतिरिक्त कामाचे तास, मानसिक आरोग्य आणि वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ डॉक्टरांचा मानसिक छळ हे प्रश्न पुन्हा पुढे आले आहेत. त्यामुळे या विषयावर राष्ट्रीय स्तरावर मोहीम राबवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी घेतला आहे.
देहराडून येथील वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच एका निवासी डॉक्टरने आत्महत्या केली. या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन ज्युनियर डॉक्टरांच्या संघटनेने निषेध केला आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांना अजूनही ४० तास काम करावे लागते. तसेच वरिष्ठ डॉक्टरांकडूनही निवासी डॉक्टरांसोबत गैरवर्तन केल्याच्या घटना सर्रास घडत असतात. त्यामुळे डॉक्टर मानसिक तणावाचे बळी ठरून आत्महत्येचा मार्ग पत्करतात. या प्रश्नाकडे रुग्णालय प्रशासन व सरकारचे अनेकदा लक्ष वेधण्यात येऊनही वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांचा छळ कायम आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांशी निगडीत असलेल्या या प्रश्नावर राष्ट्रीय स्तरावर आवाज उठविण्याचा निर्णय आयएमएच्या कनिष्ठ डॉक्टरांनी घेतला आहे. डॉक्टरांच्या मानसिक छळाबाबत राष्ट्रीय स्तरावर आंदोलन करून त्यावर ठोस निर्णय घेण्याची मागणी सरकारकडे करण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. इंद्रनील देशमुख यांनी सांगितले.