लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : घरकामगाराच्या गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या ७३ वर्षांच्या आरोपीची आजारपण आणि वृद्धत्वाच्या कारणास्तव जामीन देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली.
भालचंद्र म्हात्रे असे आरोपीचे नाव असून त्याला २०१७ मध्ये बलात्काराच्या आरोपाप्रकरणी अटक झाली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे. कनिष्ठ न्यायालयाने त्याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवून शिक्षा केली होती. या शिक्षेविरोधात केलेले अपील उच्च न्यायालयाने यापूर्वीच दाखल करून घेतले होते. अपील करतानाच आरोपीने अपिलावर अंतिम निर्णय दिला जाईपर्यंत त्याची शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली होती. त्याच्या या मागणीवर न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या एकलपीठाने नुकताच निर्णय देताना न्यायालयाने त्याला दिलासा नाकारला.
आणखी वाचा-नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांतून आरोपीने हे कृत्य लपवण्याचा आणि पीडित मुलीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. शिवाय, घटना घडली त्यावेळी पीडित मुलगी २३ वर्षांची होती आणि मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार ती गतिमंद आहे. त्यामुळे, या प्रकरणी संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रश्चच उद्भवत नसल्याचे सकृतदर्शनी मतही न्यायालयाने आरोपीची जामिनाची याचिका फेटाळताना नमूद केले.
पीडित तरुणी घटनेच्या आधी चार वर्षे आरोपीच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. घटनेच्या दिवशी आरोपीची पत्नी घरात नव्हती. त्याचा फायदा घेऊन आरोपीने पीडित मुलीवर दोनवेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. डीएनए चाचणीसाठी योग्य प्रकारे नमुने गोळा करण्यात आले नाहीत आणि पुराव्यांमध्ये तफावत असल्याचा दावा आरोपीने जामिनाची मागणी करताना केला होता. तसेच, आरोपी ७३ वर्षांचा असून त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्याचप्रमाणे, गेल्या साडेसात वर्षांहून अधिक काळ तो कारागृहात आहे, असेही त्याने जामिनाची मागणी करताना न्यायालयाला सांगितले होते.
आणखी वाचा-सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
दुसरीकडे, आरोपीने केलेल्या कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि आरोपीच बाळाचे वडील असल्याचे डीएनए चाचणीतून निष्पन्न झाल्याचा दावा सरकारी पक्षाने न्यायालयात केला. आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण दडपण्यासाठी पीडित मुलगी आणि तिच्या आईवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना यश आले नाही. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि आरोपीला अटक करण्यात आली, असेही सरकारी वकिलांनी स्पष्ट केले.