लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सांगली येथील मेफेड्रोन निर्मितीचा कारखाना उद्धवस्त केला. कुर्ला, सांगली, गुजरातमधील सूरत या ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी २५२ कोटी रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कुर्ला येथे गुन्हे शाखेच्या कक्ष ७ च्या पथकाने वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली परवीन बानो शेख (३३) या महिलेला ६४१ ग्रॅम एमडीसह अटक केली. १६ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या कारवाईत १२ लाख २० हजार व २५ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. निरीक्षक आत्माजी सावंत यांनी तिची चौकशी केली असता मीरारोड येथील व्यक्तीकडून हे एमडी घेतल्याचे तिने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी मीरारोड येथील एमडी विक्रेता साजीद शेख उर्फ डेबस (२५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सहा कोटी किंमतीचा तीन किलो एमडी व तीन लाख ६८ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल मिळून आला. त्याच्या चौकशीत तो सुरत येथील दोघांना एमडी विकत असल्याचे समोर आले.

त्यानुसार निरीक्षक शिंदे, उबाळे, सपोनि अमोल माळी, उपनिरीक्षक स्वप्निल काळे, रामदास कदम, शेलार व पथकाने सुरतेला जाऊन इजाजअली अन्सारी (२४) आणि आदिल बोहरा (२२) या दोघांना अटक केली. चौकशीत ते सांगलीतून हा एमडी घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सांगलीतले इरळे गाव गाठून द्राक्षाच्या शेताच्या आड लपून गुपचूप सुरू असलेला एमडीचा कारखाना उद्धवस्त केला. त्याठिकाणी १२२ किलो ५०० ग्रॅम वजनाचा एमडी,एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून सहा जणांना अटक केली.

हेही वाचा >>>ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडीकडून समन्स

सांगलीतून पोलिसांनी प्रविण शिंदे (३४), वासुदेव जाधव (३४), प्रसाद मोहिते (२४), विकास मलमे (२५), अविनाश माळी (२८) आणि लक्ष्मण शिंदे (३५) अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील प्रविण हा मुख्य आरोपी असून मुळचा सांगलीचा असलेला प्रविण परिवारासह मीररोड येथे स्थायीक झाला होता. १० पर्यंत शिकलेल्या प्रविणने चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात जाऊन एमडी बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. आरोपी प्रविणला प्रत्येक किलो मागे एक लाख रुपये मिळत होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mephedrone manufacturing factory in sangli was raided by mumbai police crime branch mumbai print news amy