अंधेरी पश्चिम येथील चार बंगला जंक्शनजवळ सोमवारी मध्यरात्री भरधाव मर्सिडीज बेन्ज या गाडीने धडक दिल्याने पाच तरुण जखमी झाले. या जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कोकिळाबेन अंबानी इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  पोलिसांनी या प्रकरणी गाडीच्या चालकाला ताब्यात घेऊन रात्री उशीरा सोडून दिले. त्यामुळे ही गाडी नेमकी कोण चालवित होता, याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.
सोमवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हा अपघात घडला. अंधेरी पश्चिमेच्या अच्युतराव पटवर्धन मार्गावरील ‘मसाला मंत्र’ या हॉटेलसमोरुन पाच तरुण पायी जात असतांना मागून येणाऱ्या मर्सिडीज बेन्ज या आलिशान गाडीने त्यांना धडक दिली. अपघातानंतर गाडीचा चालक जखमींना मदत न देता घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात जनार्दन सिंग (२६), शशांक सिंग (२८) महेश वानवे (२४), विशाल शर्मा (२३) आणि अभिषेक व्यास (२५) हे पाच तरुण जखमी झाले.यापैकी जनार्दन आणि शशांक या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.
पोलिसांना घटनास्थळावरून अर्धवट वाहनक्रमांक मिळाला होता. त्यावरून तपास करत पोलिसांनी मर्सिडीजचा वाहन चालक दिनेश मोहन पारखे (२४) याला ताब्यात घेतले होते. त्याने मद्यपान केलेले नव्हते. परंतु संध्याकाळी त्याला सोडून दिल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी दहिफळे यांनी सांगितले.
आम्ही गाडीचा मालक फाल्गुन श्रॉफ याचीही चौकशी करणार आहोत. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा