स्कूलबसची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवण्याची तरतूद असलेला १८ नोव्हेंबर रोजीच वादग्रस्त शासननिर्णय अखेर शालेय शिक्षण विभागाने मागे घेतला. पण त्याचवेळी स्कूलबससंदर्भातील १४ सप्टेंबर २०११ रोजीचा शासननिर्णय लागूच राहणार असल्याचे शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी सांगितले. त्यामुळे मुख्याध्यापकांवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आणि स्कूलबस व्यतिरिक्त अन्य वाहनांना मनाई हे प्रमुख र्निबध जुन्या निर्णयातही समाविष्ट असल्याने स्कूलबसबाबतचा गोंधळ कायम आहे. या परिस्थितीला शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा आणि अतिरिक्त मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांच्यातील मतभेद कारणीभूत असल्याचे बोलले जाते.
स्कूलबस नियमावलीबाबत १८ नोव्हेंबरच्या निर्णयाला सर्वच स्तरातून प्रचंड विरोध झाला. मुख्याध्यापकांनी तर परीक्षेवर बहिष्काराचे अस्त्र उपसले आहे. मंत्र्यांना अंधारात ठेवून सचिवांनी परस्पर निर्णय घेतला गेल्याचेही उघड झाले. जोरदार विरोधामुळे शालेय शिक्षण विभागाला माघार घ्यावी लागली. शिक्षणमंत्री दर्डा यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली. त्यानंतर १८ नोव्हेंबरच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा आदेश मंगळवारी दुपारी जारी करण्यात आला. सुधारित धोरण नव्याने जारी करण्यासाठी या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले. सर्व संबंधितांशी चर्चा करून नवीन निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, पण १४ सप्टेंबर २०११ रोजीचा शासननिर्णय मंत्रिमंडळ निर्णयावर आधारित असून तो कायम असल्याने मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे सचिव सहारिया यांनी सांगितले. त्यामुळे स्थगितीनंतरही गोंधळ कायम आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा