एक काळ असा होता की पोस्टमनची वाट पाहिली जायची. त्यानं पत्र आणलं की आनंद दाटून यायचा आणि तार आणली तर ती उघडतानाही धस्स होत असायचं. परगावी गेलेल्या साजणाचं पत्र घेऊन येणारा पोस्टमन प्रेमिकेला मेघदूत भासायचा तर ‘स्टार्ट इमिजिएटली’ असा संदेश घेऊन चेहरा पडलेला पोस्टमन यमदूतच भासायचा. कधी तारा अभिनंदनाच्या असायच्या तर कधी गोड बातमी देणाऱ्या. तरी त्या उघडेपर्यंत छातीचे ठोके जलदच पडायचे. देशातली तारसेवा बंद होत असताना अनेकांच्या मनात तारेच्या कडूगोड आठवणी जशा असतील तशाच मृत्यूचा संदेश देणाऱ्या तारा नेणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना ‘तारेवरची कसरत’ आजही आठवत असेल.
अशाच काही आठवणींना उजळा दिला तो पांडुरंग तळेकर यांनी.
तार खात्यात मी ‘तार मेसेंजर’ म्हणून सुरुवात केली आणि पुढे खात्याअंतर्गत परिक्षा देऊन मी वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झालो. त्यामुळे तार खात्यातील सर्व स्थित्यंतरे मी स्वत: अनुभवली आहेत. तार बंद होणार असल्याने मला मी निवृत्त होताना जेवढे वाईट वाटले नाही, त्यापेक्षा अधिक दु:ख आता होतेये, अशा शब्दांत पांडुरंग तळेकर यांनी ‘लोकसत्ता’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
१९५२ मध्ये तार खात्यात ‘तार मेसेंजर’ म्हणून नोकरीला सुरुवात झाली. तेव्हाचे आपले काही अनुभव सांगताना तळेकर म्हणाले की, ‘तारवाला’ दारात उभा राहिला की लोकांच्या छातीत धस्स व्हायचे. तारवाला तार घेऊन घरी आला की प्रत्येक वेळी वाईट बातमीच असायची असे नाही तर आनंदाचीही बातमी तारेत असायची. पण लोकांना तारवाला घरी आला की भीतीच वाटायची. लोकांना आम्ही ‘यमदूत’ वाटायचो. पण आम्ही तरी काय करणार? तारेतील मजकूर संबंधित व्यक्तिपर्यंत पोहोचविण्याचे आमचे कर्तव्य आम्ही बजावायचो. अर्थात असे असले तरी आम्हीही माणूस होतो. आम्हालाही भावना होत्या. त्यामुळे वाईट बातमीची तार असली की काही वेळा तार पाहिल्यानंतर आणि वाचल्यानंतर लोक अक्षरश: हंबरडा फोडायचे आणि आम्हालाही खूप गलबलून यायचे आणि पोटात गोळा यायचा, असे तळेकर यांनी सांगितले.
अशीच एक आठवण सांगताना तळेकर म्हणाले की, भायखळा येथे एका घरी त्या व्यक्तीची आई गेल्याची तार घेऊन मी गेलो होतो. तार घेतली आणि त्या माणसाला आनंद झाला. मला ते थोडे विचित्र वाटले म्हणून मी त्यांना विचारले. तर ती व्यक्ती मला म्हणाली की माझे वय ८० असून माझ्या आईचे वय १०० च्या पुढे होते. वृद्धापकाळाने ती अंथरुणावर लोळागोळा होऊन पडली होती. अहो तिचे हाल पाहावत नव्हते. देवानेच तिची यातून सुटका केली म्हणून मला बरे वाटले.. त्यांच्या या स्पष्टीकरणावर क्षणभर काय बोलावे तेच मला कळेना.
‘अहर्नीश सेवामहे’ हे आमचे ब्रीदवाक्य होते. त्यामुळे थंडी, ऊन, वारा आणि पाऊस काहीही असले तरी लोकांच्या घरी कोणत्याही वेळेत जाऊन आम्ही त्यांचा संदेश पोहोचोवित होतो. ज्या तार खात्यातील हजारो कर्मचारी तारेच्या माध्यमातून लोकांच्या सुख-दु:खात सहभागी झाले, त्या सर्वाचे आता काय होणार या विचाराने बैचैन झालो असल्याचेही तळेकर यांनी सांगितले.
संघटनांचा विरोध
तार सेवा बंद करण्याचा निर्णय मान्यताप्राप्त कामगार संघटनांना विश्वासात न घेता घेण्यात आला असून ही सेवा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने या बाबत संसदेत चर्चा करून आणि संपूर्ण सेवेचा येत्या सहा महिन्यात आढावा घेऊन त्यानंतरच निर्णय घेतला जावा, अशी मागणी ‘बीएसएनएल एम्पॉईज युनियन’चे मुंबई जिल्हा सचिव आणि महाराष्ट्र परिमंडळाच्या सर्कल कौन्सिलचे सदस्य सत्यवान उभे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली.
उभे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकातील केंद्रीय तार कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसांच्या आंदोलनाची सांगता झाली. तार सेवा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून येथे कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
उभे म्हणाले की, मुंबईच्या मुख्य तार कार्यालयातून दर दिवशी पाच हजारांहून अधिक तारा जातात. तार सेवा तोटय़ात असल्याचे सांगितले जात असले तरी त्यात तथ्य नाही. मुंबईत तार सेवा सुमारे पन्नास लाखांचा महसूल मिळवून देत आहे. केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना निवेदन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा