मुंबई : सौंदर्य प्रसाधन कायद्याचे उल्लंघन करत मिसवाक दंतमंजनची विक्री करणाऱ्या डाबर कंपनीने उत्पादनाच्या आवरणावरील जाहिरात रद्द करण्यासंदर्भात, तसेच ही जाहिरात असलेली उत्पादने बाजारातून परत घेण्याबाबत मुंबई उच्च न्यालयालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे आता मिसवाक दंतमंजनाच्या आवरणावर असलेली दातासंदर्भातील वेदना आणि आजार बरे करण्याचा दावा करणारी जाहिरात काढण्यात येणार आहे. दरम्यान, कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने ऑक्टोबर २०२४ मध्ये मिसवाक दंतमंजनचा ४१ लाखांचा माल जप्त केला होता.
सौंदर्य प्रसाधानाच्या परवान्यांतर्गत निर्मिती करण्यात येणारे उत्पादन हे दाह किंवा त्यासंदर्भातील आजार बरे करण्याचा दावा करू शकत नाही, असे असतानाही मिसवाक दंतमंजनाच्या वापराने दात व हिरड्यांमधील दाह कमी होत असल्याची जाहिरात या उत्पादनाच्या आवरणावर करण्यात येत होती. याची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने ऑक्टोबर २०२४ मध्ये मिसवाकच्या उत्पादनावर कारवाई करत ४१ लाखांचा माल जप्त केला होता. तसेच बाजारात असलेला माल परत मागविण्याच्या सूचना देत हे उत्पादन थांबविण्याचे निर्देश डाबर कंपनीला दिले होते. मात्र कंपनीने उत्पादन न थांबविता याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ‘डाबर मिसकवा दंतमंजन’ आणि ’डाबर हर्बल अँटी-बॅक्टेरियल टूथपेस्ट तुलसी’ हे दोन्ही उत्पादने थांबविण्यासंदर्भात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार डाबर कंपनीने ही दोन्ही उत्पादने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांची दिशाभूल करणाऱ्या या दोन्ही उत्पादनांची आवरणावरील जाहिरात काढण्यात येणार आहे. तोपर्यंत दोन्ही उत्पादनांची निर्मिती बंद ठेवण्यात येणार आहे.
भिवंडीतील गोदामांवर केली कारवाई
डाबर कंपनीकडून मिसवाकच्या वापरामुळे दात, हिरड्या यांचा होणार दाह कमी होत असल्याची खोटी जाहिरात करण्यात येत असल्याची लेखी तक्रार ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. अभय पांडे्य यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली होती. तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने २३ ऑक्टोबर रोजी डाबर कंपनीच्या भिवंडी येथील गोदामामध्ये छापा मारला. या छाप्यामध्ये मिसवाक या दंतमंजनच्या उत्पादनावर सौंदर्य प्रसाधनाच्या नियमाविरोधात जाहिरात होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गोदामामधील तब्बल ४१ लाखांचा माल जप्त करण्यात आला होता.
नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांना चपराक
डाबर कंपनीकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल करणे, फसव्या विपनन करून जनतेच्या विश्वासाला तडा देण्याचे काम होत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे नागरिकांच्या दिशाभूल करणाऱ्या डाबरला चपराक बसली आहे. सौंदर्य प्रसाधने आणि औषध उत्पादनांशी संबंधित नियमावली सुनिश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी मााहिती ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे्य यांनी दिली.