मुंबई : मुंबईतील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. मागील दोन-तीन दिवस मुंबईत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता शनिवारपासून पुढील दोन दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत तापमानात वाढीची शक्यता नसली तरी उकाड्याचा ताप होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी ३३.९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, मागील काही दिवस पावसाळी वातावरणामुळे मुंबई, ठाणे परिसरात तीव्र उकाडा जाणवत आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे त्यात भर पडत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून कोकणातील अनेक भागांत पाऊस कोसळला. शविवारपासून मात्र, या भागात उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
गारपिटीचा इशारा कायम
राज्यातील काही भागांत उकाड्यामुळे नागरिक हैराण असतानाच विदर्भात गारपिटीचा इशारा कायम आहे. विदर्भातील चंद्रपूर, अकोला, अमरावती जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारेही वाहतील.
एप्रिलमध्ये तापमानवाढीची शक्यता
यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिल ते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका तापदायक ठरणार असून, राज्यात तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र अधिक तापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र उष्ण लाटांचा इशारा आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही काही प्रमाणात उष्ण लाटांची शक्यता आहे.
राज्यात उष्माघाताचे ३० रुग्ण
● मार्च महिना सुरू झाल्यापासून तापमान सातत्याने वाढत असून, अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे राज्यात मार्चमध्ये ३० जणांना उष्माघात झाला. १४ जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडले असले तरी मुंबईमध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.
● बुलढाणा, गडचिरोली व परभणी या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे सर्वाधिक प्रत्येकी चार रुग्ण सापडले आहेत. मात्र २२ जिल्ह्यांत एकही उष्माघाताचा रुग्ण नाही. मुंबईमध्येही अद्याप उष्माघाताच्या एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत राज्यामध्ये ४० जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.
● उष्णतेच्या लाटेच्या काळात स्वच्छ पाणी प्या, हलका आहार घ्या, सावलीत राहण्याचा प्रयत्न करा आणि गरज असल्यास वैद्याकीय मदत घ्या, असा सल्ला आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिला आहे.