मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उन्हाने अंगाची काहिली होत आहे. असह्य उकाडा आणि उन्हाचे चटके यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. दरम्यान, मुंबईत मंगळवारी सर्वाधिक उष्णता जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.गेल्या आठवड्यापासून शहरात उष्णतेमुळे सुरू असलेली काहिली आजही कायम राहण्याची शक्यता आहे. मागील काही दिवस मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. यातच आजचा दिवस मुंबईकरांसाठी अधिक तापदायक असणार आहे.
समुद्राच्या सानिध्यामुळे मुंबईच्या हवेत बाष्पाचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे पुणे – नागपूरमधील तापमानाच्या तुलनेत तापमान कमी असूनही घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण होतात. गेले काही दिवस मुंबईकर उष्णतेच्या तीव्र झळा अनुभवत असल्याने मे महिन्यातील उन्हाळ्याची चिंता वाढली आहे. मुंबईतील कमाल तापमानाचा पारा सोमवारी ३६ अंशांवर पोहोचला होता. आज आणि पुढील एक दोन दिवसांत हा पारा ३७ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, आज वातावरणात उष्णता साचून राहिल्याची जाणीव होईल. याचबरोबर उन्हाचा दाह अधिक असेल.
उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता
वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. उन्हामध्ये सातत्याने काम केल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होतो. परिणामी शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे कोणत्याही सुरक्षेशिवाय उन्हात फिरल्यास उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असते. उष्णता प्रचंड वाढत असल्याने नागरिकांना उलटी होणे, चक्कर येणे, निर्जलीकरण होणे, बेशुद्ध पडणे, उष्माघाताचा त्रास होतो.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी
वाढती उष्णता लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हात बाहेर पडणे टाळावे, बाहेर जायचे असल्यास टोपी, गॉगलचा वापर करावा. तसेच पाण्याची बाटली कायम जवळ बाळगावी, अधिकाधिक फळे खावीत, जेणेकरून वाढत्या उन्हाचा त्रास फारसा होणार नाही.
कोकणात उष्ण व दमट वातावरणाचा इशारा
अवकाळी पावसाचे वातावरण ओसरताच राज्यातील तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. कोकणातही उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आज कोकणात असह्य उकाडा सहन करावा लागले. याचबरोबर तेथील तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा
राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर, विदर्भातील काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये अकोला, नागपूर तसेच यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे.
उष्णतेचा त्रास झाल्यास काय करावे
संबंधित व्यक्तीला तातडीने थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये हलवावे.
शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
पुरेसे पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रवपदार्थ द्या.
आज पावसाचा अंदाज कुठे
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी आज ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
२४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान
सांताक्रूझ – ३३.८ अंश सेल्सिअस
डहाणू- ३६.१ अंश सेल्सिअस
ठाणे – ३८ अंश सेल्सिअस
रत्नागिरी- ३३.४ अंश सेल्सिअस
छत्रपती संभाजीनगर – ४०.२ अंश सेल्सिअस
सांगली – ३८.३ अंश सेल्सिअस
नाशिक – ४०.२ अंश सेल्सिअस
सोलापूर – ४१.४ अंश सेल्सिअस
पुणे- ३९.२ अंश सेल्सिअस
धुळे- ४२.० अंश सेल्सिअस
जळगाव- ४२.५ अंश सेल्सिअस
कोल्हापूर- ३८.१ अंश सेल्सिअस
मालेगाव – ४०.८ अंश सेल्सिअस
निफाड – ३९.५ अंश सेल्सिअस
अकोला – ४४.२ अंश सेल्सिअस
चंद्रपूर – ४२.६ अंश सेल्सिअस