लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबईत शनिवारपासून पाऊस सक्रिय झाला असून रविवारीही शहर तसेच दोन्ही उपनगरांत सकाळपासूनच मुसळधारा कोसळल्या. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत सोमवारीही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघर जिल्ह्यांत देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला होता. परिणामी, मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. शनिवारी मुंबईत झालेल्या पावसामुळे हवेत गारठा वाढला आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. रविवारीही मुंबईत कोसळलेल्या पावसामुळे नागरिक सुखावले. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत १९.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ८.४ मिमी पावसाची नोंद झाली.

आणखी वाचा-TISS Student Dead : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा विद्यार्थी पार्टीनंतर मृतावस्थेत आढळला; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. कोकणात व घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.

ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी सुरू झालेला पावसाचा जोर रविवारीदेखील कायम होता. ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात सकाळपासून पाऊस पडत होता. या पावसामुळे शहरांमधील सखल भागात पाणी साचले होते. तर, गोकुळाष्टमीनिमित्त बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची या पावसाने तारांबळ उडाली होती. या पावसामुळे मागील काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ठाणे शहरात रविवारी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत १५.७३ मिमी पावसाची नोंद आपत्ती विभागाकडे करण्यात आली होती. कल्याण डोंबिवली शहरातही रविवारी पावसाचा लपंडाव सुरू होता. मात्र, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात रविवारी पावसाची संततधार सुरू होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meteorological department predicted heavy rain in mumbai today mumbai print news mrj