लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मागील दोन दिवसांपासून उन्हाचे चटके आणि उष्मा काहीसा कमी झाला आहे. तसेच चाळिशीच्या आसपास पोहोचलेला तापमानाचा पारा आता थेट ३२ अंशावर आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी महिन्यातच मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला होता. या महिन्यातही उष्णतेच्या लाटेचा त्रास झाला. दरम्यान, आता मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत तरी उष्णतेची लाट येणार नाही. पुढील दोन आठवड्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना उन्हाचे चटके आणि असह्य उकाडा सोसावा लागत होता. मात्र, मागील दोन – तीन दिवसांपासून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३२.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ३८ आणि ३९ अंशावर गेलेले तापमान आता थेट ३२ अंशावर आले आहे. परिणामी, उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. याचबरोबर रात्री आणि पहाटे गारवा जाणवत आहे.
दरम्यान, मार्च अखेरपर्यंत उष्णतेची लाट येणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे पुढील दोन आठवडे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. उकाडा असला तरी तापमानात घट झाल्याने उन्हाचा तडाखा जाणवणार नाही. याचबरोबर रात्री आणि पहाटे गारवा असल्याने दिलासादायक वातावरण असेल.
दरम्यान, समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घामाचा त्रास मुंबईकरांना अधिक होतो. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळतात. तापमानाचा पारा फारसा चढणार नसला तरी उकाड्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे. मात्र , साधारणपणे होळीनंतर ऊन वाढते. मात्र, यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाली होती.
विदर्भातही उष्णतेची लाट ओसरली
राज्याच्या कमाल तापमानात घट झाल्याने विदर्भात आलेली उष्णतेची लाट ओसरली आहे. तसेच राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदा मोसमी पाऊस चांगला बरसणार – ‘अपेक’चा अंदाज
दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्राने यंदा देशात मोसमी पाऊस सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक बरसणार असल्याचे संकेत दिले आहेत. परंतु पुढच्या महिन्यात हवामानशास्त्र विभाग मोसमी पावसाचा पहिला अंदाज व्यक्त करेल, त्यानंतर मोसमी पावसाबद्दल अधिक स्पष्टता येईल, असे हवामान अंदाज अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हवामानशास्त्र विभागाच्या पहिल्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
प्रत्येक महिन्यात अपेककडून अंदाज वर्तवला जातो. त्यासाठी ११ देशातील १५ हवामान केंद्राच्या डेटा मॉडेलचा वापर करून एप्रिल ते जुलै दरम्यानचा अंदाज वर्तवला जातो. त्यामध्ये दक्षिण गुजरात, गोवा, किनारी कर्नाटक, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, तर महाराष्ट्रातील मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पूर्व मोसमी पावसाची शक्यता अपेकने वर्तवली आहे.