मुंबई : यंदा मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेआधी म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी ही आनंदवार्ताच ठरते.

मोसमी पावसाचा प्रवास

नैर्ऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरातून प्रवास करत १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो ५ जूनपर्यंत कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो. १० जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यात पोहोचतो.

केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर त्यानंतर साधारण सहा ते आठ दिवसांनी मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल होतो. दरम्यान, हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, यंदा मोसमी पाऊस मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता अधिक आहे. सामान्यतः मुंबईत पावसाळा १० जूननंतर सुरू होतो, परंतु यंदा ८ ते ११ जून दरम्यान पावसाळा सुरू होण्याची ९२ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे . यामुळे मुंबईकरांना यंदा जूनच्या मध्यापर्यंत पावसाची वाट पहायला लागणार नाही.

मोसमी पाऊस दाखल म्हणजे काय?

भारताच्या भूमीवर नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो. साधारण मे महिन्यापासूनच राज्यात पाऊस हजेरी लावतो. मात्र तो मोसमी पाऊस नाही. मोसमी पावसाची सुरुवात झाली किंवा मान्सून सक्रिय झाला हे वातावरण, हवामानाची विशिष्ट स्थिती याबाबतच्या संकेतांच्या आधारे जाहीर केले जाते.

गेल्या वर्षीही लवकरच

गेल्या वर्षी मोसमी पाऊस मुंबईत ९ जून रोजी दाखल झाला होता. म्हणजेच नेहमीच्या वेळेपेक्षा एक दोन दिवस आधी. २०२३ मध्ये उशिरा म्हणजेच २५ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता. २०२२ मध्ये ११ जून, २०२१- ९ जून, तर २०२० मध्ये १४ जून रोजी मोसमी पाऊस दाखल झाला होता.

यंदा सरासरीपेक्षा जास्त

संपूर्ण मोसमी पावसाच्या काळात एल निनो सक्रिय होण्याची स्थिती नाही. हिंदी महासागरीय द्विध्रुविताही तटस्थ आहे. डिसेंबर – मार्च या काळात युरोशिया आणि हिमालयात बर्फाच्छादित भाग सरासरीपेक्षा कमी राहिला त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा जास्त १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

एल निनोचा अडसर नाही

प्रशांत महासागरात सक्रिय असलेली ‘ला निना’ स्थिती जाऊन तटस्थ स्थिती तयार झाली असून, मान्सूनच्या काळात ‘एल निनो’ची स्थिती तयार होणार नसल्याचे हवामान शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने म्हटले आहे. तर, यंदा प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थिती तयार होण्याची शक्यता फक्त २० टक्के आहे, असे अमेरिकेतील ‘नोआ’ संस्थेच्या सेंट्रल प्रेडिक्शन सेंटरच्या अभ्यासात नमूद केले आहे.