प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एम एमओपीएल) ई-तिकिटाची सुविधा यापूर्वी उपलब्ध करून दिली आहे. मात्र हे तिकीट घेण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीवर जावे लागते, रांगेत उभे रहावे लागते. आता मात्र तिकीट खिडकीवर न जाता, रांग न लावता व्हाट्सएपवर तिकीट उपलब्ध होणार आहे. उद्यापासून, गुरुवारपासून एमएमओपीएलकडून या सेवेचा आरंभ करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>मुंबई: बेस्टची दुमजली वातानुकुलीत बसची प्रतीक्षा; प्रीमियम बस सेवाही नाही
मेट्रो १ मधून दिवसाला पाऊणे चार लाख प्रवासी प्रवास करतात. अंधेरी येथील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यापासून प्रवासीसंख्या २० हजाराने वाढली आहे. लवकरच प्रवासीसंख्या चार लाखांचा पल्ला गाठेल असा विश्वास एमएमओपीएलने व्यक्त केला आहे. प्रवासीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एमएमओपीएलने प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत त्यांचा मेट्रो प्रवास कसा सुकर करता येईल याचाही प्रयत्न होताना दिसतो. याचाच भाग म्हणून आता एमएमओपीएलने व्हाट्सअप ई-तिकिट सेवा सुरु केली आहे.
हेही वाचा >>>मुंबई: विलेपार्लेत स्टुडिओ घोटाळ्यात पालिकेची वरवरची कारवाई; उपायुक्तांना खोटा अहवाल सादर
एमएमओपीएलने एप्रिलमध्ये ई-तिकीट सेवा सुरू केली. मात्र हे ई-तिकीट घेण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडकीवर जावे लागते. मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रवाशाला ई-तिकीट उपलब्ध होते. पण प्रवाशांना तिकीट खिडकीवर जावे लागू नये यासाठी एमएमओपीएलने आता व्हाट्सअपवर ई-तिकीट उपलब्ध करून दिले आहे. तिकीट व्हॉट्सअॅपद्वारे क्युआर (क्विक रिस्पॉन्स) कोडच्या रूपात वितरित केले जाणार आहे. ९६७०००८८८९ या क्रमांकावरील व्हाट्सअपवर ‘हाय’ असा मॅसेज पाठविल्यानंतर जी लिंक येईल त्यावरून संबंधित प्रक्रिया पूर्ण करून ऑनलाइन पेमेंटद्वारे ई-तिकीट घेता येईल.