मुंबई : ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवर कमी अंतराच्या मेट्रो फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) घेतला आहे. या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोमवारपासून सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत घाटकोपर – अंधेरी मार्गिकेवर मेट्रोच्या फेऱ्या सुरू होणार आहेत. यामुळे घाटकोपर – अंधेरीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अंधेरी – घाटकोपरदरम्यान प्रवास करणारे ८८ टक्के प्रवासी
मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असलेली ‘मेट्रो १’ मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली. या मार्गिकेला आता प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी अंधेरी – घाटकोपरदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. एमएमओपीएलच्या एका अभ्यासानुसार एकूण प्रवासी संख्येच्या ८८ टक्के प्रवासी घाटकोपर – अंधेरीदरम्यान प्रवास करतात. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी मेट्रो गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यातच अंधेरीच्या पुढे मेट्रो गाड्या बऱ्यापैकी रिकाम्या जातात. ही बाब लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणात आणून प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी एमएमओपीएलने कमी अंतरावर ‘मेट्रो १’च्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार घाटकोपर – अंधेरीदरम्यान मेट्रो गाड्या सुरू करण्यासाठी मार्चमध्ये चाचण्यांना सुरुवात केली. या चाचण्या यशस्वी झाल्याने आता सोमवार, ७ एप्रिलपासून घाटकोपर – अंधेरी मेट्रो गाड्या सुरू करण्याच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे. सोमवारपासून सकाळी दोन तास आणि सायंकाळी दोन तास घाटकोपर – अंधेरीदरम्यान मेट्रो गाड्या धावणार असल्याची माहिती एमएमओपीएलमधील सूत्रांनी दिली.
या वेळेत कमी अंतराच्या मेट्रो गाड्या
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० ते १०.४० आणि सायंकाळी ६.२० ते ८.३० या वेळेत घाटकोपर – अंधेरीदरम्यान मेट्रो गाड्या धावतील. मेट्रो १ मार्गिकेवरील एकूण ४३४ फेऱ्यांपैकी ४० फेऱ्या घाटकोपर – अंधेरीदरम्यान होतील. यापैकी २० फेऱ्या सकाळी आणि २० फेऱ्या सायंकाळी होतील. दरम्यान, घाटकोपरवरून निघालेली मेट्रो आतापर्यंत वर्सोव्याला जाऊन पुन्हा घाटकोपरकडे येत आहे. पण आता मात्र सकाळी आणि सायंकाळी निश्चित वेळेत घाटकोपरवरून निघालेली कमी अंतराची मेट्रो अंधेरीवरून पुन्हा प्रवाशांना घेऊन घाटकोपरला येईल. सकाळी ८.३० ते १०.४० आणि सायंकाळी ६.२० ते ८.३० दरम्यान मेट्रो गाडीची एक फेरी घाटकोपर – अंधेरी अशी असेल, तर दुसरी फेरी घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा अशी असणार आहे.