मुंबई : अंधेरी पश्चिम – मंडाळे मेट्रो २ ब मार्गिकेवरील वांद्रे पश्चिम येथील एस.व्ही. रोडवरील नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक वगळण्यात येणार आहे. वांद्रे पश्चिम येथील रहिवाशांसह आमदार आशिष शेलार यांच्या मागणीनुसार हे स्थानक वगळण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तयार केला आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्र, एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि प्राधिकरणाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
एमएमआरडीएकडून २३.६४३ किमी लांबीच्या अंधेरी पश्चिम – मंडाळे मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरु आहे. या मार्गिकेत २० स्थानकांचा समावेश असून यातील एक मेट्रो स्थानक म्हणजे नॅशनल कॉजेल मेट्रो स्थानक. वांद्रे पश्चिम येथील एस.व्ही. रोडवरील टाटा ब्लॉक्स पारसी कॉलनीसमोर ग्रेस गॅलेक्सी हॉटेल ते मारुती ऑटो व्हिस्टा शोरूमपर्यंत असे हे स्थानक प्रस्तावित आहे. पण आता मात्र हे स्थानक वगळण्यात येणार आहे. या स्थानकाला विरोध करीत ते इतरत्र हलविण्याची मागणी रहिवाशांनी एमएमआरडीएकडे केली आहे. नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानकाच्या कामासाठी येथील साधू वासवानी उद्यानातील काही झाडे कापावी लागणार असून यामुळे २९० चौ.मीटर हिरवळ कमी होणार आहे. ही हिरवळ कायम राखण्यासाठी स्थानिकांनी हे स्थानक इतरत्र हलविण्याची मागणी फेब्रुवारीत केली होती.
हेही वाचा >>>मुंबईकरांवर पुन्हा पाणीकपातीचे सावट; आढाव्यानंतर १ ऑक्टोबरला निर्णयाची शक्यता
या मागणीच्या अनुषंगाने आशिष शेलार यांनी एमएमआरडीएला एक पत्र पाठवून पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. एमएमआरडीएने हे स्थानक इतरत्र हलविण्याच्या दृष्टीने चाचपणी केली. मात्र स्थानक इतरत्र हलविणे शक्य नसल्याने थेट नॅशनल कॉलेज मेट्रो स्थानक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीएने एका पत्राद्वारे आशिष शेलार यांना यासंबंधी कळविले आहे. या पत्रानुसार यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला, आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास तो प्राधिकरणाच्या बैठकीत ठेवला जाईल. येथे हा प्रस्ताव मान्य झाल्यास यासंबंधीचा अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. दरम्यान हे स्थानक रद्द झाल्यास नॅशनल कॉलेज, रेल्वे कॉलनी, टाटा ब्लॉक्स पारसी कॉलनी परिसरातील प्रवाशांना मेट्रो प्रवासासाठी खार येथील सारस्वत मेट्रो स्थानक वा वांद्रे पश्चिम मेट्रो स्थानकात जावे लागणार आहे.