मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ या दोन्ही मार्गिका मुंबईकरांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या मार्गिकांच्या दुसऱ्या टप्प्याचे नुकतेच लोकार्पण झाले. त्यानंतर केवळ आठवड्याभरात या मार्गिकांवरून १० लाख प्रवाशांनी प्रवास केला. या मार्गिकांचा पहिला टप्पा सेवेत दाखल झाल्यापासून दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या असून २ एप्रिल २०२२ ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत या मार्गिकांवरून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांची संख्या एक कोटीपार गेली आहे. आतापर्यंत या मार्गांवरून एक कोटी तीन हजार २७० प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो प्रकल्पातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील अंदाजे ४५ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे मुंबईत पूर्ण झाले आहे. ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’नंतर आता ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रोे ७’ पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. आजघडीला मुंबईत तीन मेट्रो मार्गिका सेवेत असून या तिन्ही मार्गिका थेट एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे मेट्रोला प्रतिसाद वाढत आहे.
हेही वाचा >>> मुंबई : नायगाव स्थानकात क्रेनची लोकलला धडक, मोठी दुर्घटना टळली, मोटरमन जखमी
‘मेट्रो १’च्या प्रवासी संख्येतही वाढ होऊ लागली आहे. असे असताना आता ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांनी शुक्रवारी एक महत्त्वाचा टप्पा पार केला. या दोन्ही मार्गिकांवरून २ एप्रिल २०२२ ते २७ जानेवारी २०२३ एक कोटी तीन हजार २७० प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. मुंबईकर मेट्रोकडे वळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, आजघडीला २२ मेट्रो गाड्या या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरून धावत असून दररोज त्यांच्या २२५ फेऱ्या होत आहेत.
मेट्रोबरोबरच एमएमआरडीएच्या ‘मुंबई १’ कार्ड आणि ॲपला मुंबईकरांची पसंती मिळू लागली आहे. आठवड्याभरात २० हजार कार्डची विक्री झाली असून ७५ हजार ७३९ जण ‘मुंबई १’ ॲपचा वापर करीत असल्याचे श्रीनिवास यांनी यावेळी सांगितले. या ॲपमुळे सहज ई-तिकीट उपलब्ध होत आहे. तर कार्डमुळे मेट्रो आणि बेस्ट बस प्रवास करणे शक्य झाले आहे. त्यामुळे कार्डला प्रतिसाद वाढत आहे. या कार्डवरून कोणत्याही प्रकारची खरेदीही करता येत आहे. म्हत्त्वाचे म्हणजे हे कार्ड वापरणाऱ्यांना सोमवार ते शुक्रवारदरमान्य ५ टक्के आणि शनिवार – रविवार, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी १० टक्के सवलत मिळत आहे.