मुंबई : मागील तीन-चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून याचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. लोकलचा बुधवारी मोठा खोळंबा झाला होता. मात्र रेल्वे सेवा विस्कळीत झालेली असतानाच पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मेट्रोचा आधार मिळाला. दहिसर – अंधेरी पश्चिम आणि दहिसर – गुंदवली, अंधेरी पूर्व असा प्रवास करण्यासाठी अनेक प्रवाशांनी ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ला पसंती दर्शवली. या दोन्ही मार्गिकांवरून बुधवारी तब्बल दोन लाख १४ हजार ७० प्रवाशांनी प्रवास केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ या मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल २०२२ मध्ये, तर दुसरा टप्पा १९ जानेवारी २०२३ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. पहिल्या टप्प्यात या मार्गिकांवरून दर दिवशी सरासरी ३० हजार ५०० प्रवासी प्रवास करीत होते. मात्र दुसऱ्या टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर या दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्या. त्यामुळे प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली. महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळाने (एमएमएमओसीएल) दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात या मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासीसंख्या दोन लाखांपार पोहोचली. या दोन्ही मार्गिकांवरून २७ जून रोजी एकूण दोन लाख ३ हजार ५८१ मुंबईकरांनी प्रवास केला होता.

हेही वाचा – मुंबई : कमी जागेत सरकत्या जिन्यांची उभारणी, प्रवाशांना फलाटावरून प्रवास करणे होणार सोयीस्कर

हेही वाचा – विकासकांना रेरा कायद्याचा धाक नाही? कारवाईनंतरही रेरा क्रमांकांशिवाय जाहिरात प्रसिद्ध करण्याचे प्रकार सुरूच

‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवासीसंख्येने दोन लाखांचा टप्पा पार केल्यानंतर आता अवघ्या काही दिवसांतच प्रवासीसंख्या दोन लाखांवरून दोन लाख १४ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचल्याने वा इतर कारणांमुळे बुधवारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. यावेळी अनेक प्रवाशांनी मेट्रोला पंसती दिली. मुसळधार पावसातही मेट्रो सेवा सुरळीत सुरू होती. त्यामुळे ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरून बुधवारी दोन लाख १४ हजार ७० प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती एमएमएमओसीएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. आतापर्यंतच्या दैनंदिन प्रवासी संख्येच्या तुलनेत बुधवारची प्रवासीसंख्या सर्वाधिक होती, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro 2a and metro 7 run smoothly in mumbai daily passenger numbers on both lines cross two lakh 14 thousand mumbai print news ssb