मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिरणाच्या (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन असा पहिला टप्पा डिसेंबरअखेर वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएने नियोजन आहे. त्यानुसार आता एमएमआरडीएने या टप्प्याच्या कामाला वेग दिला असतानाच दुसरीकडे हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा मंडाले कारशेडच्या कामाच्या पुर्णत्वास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार आतापर्यंत कारशेडचे ९७ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. तर आता विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असून ८ एप्रिलपासून कारशेडमधील विद्युत प्रवाहन सुरु होणार आहे. त्यामुळे आता लवकरच कारशेडमध्ये मेट्रो गाड्यांच्या इतर चाचण्यांना सुरुवात होणार असून पहिला टप्पा सुरु करण्याच्यादृष्टीने हे एमएमआरडीएचे महत्त्वाचे पाऊल आहे.
कारशेडचे ९७ टक्के काम पूर्ण
एमएमआरडीएच्या ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पातील मेट्रो २ ब ही एक महत्त्वाची मेट्रो मार्गिका आहे. कारण या मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरातून थेट मध्य उपनगरात जाणे सोपे होणार आहे. त्यामुळे ही मार्गिका केव्हा वाहतूक सेवेत दाखल होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे. अशावेळी अंधेरी ते मंडाले असा मेट्रो प्रवास करण्यासाठी प्रवाशांना काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण मंडाले ते डायमंड गार्डन असा मेट्रो प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न मात्र डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. कारण मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले हा पहिला टप्पा डिसेंबरअखेर कार्यान्वित करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. याअनुषंगाने पहिल्या टप्प्याच्या कामाला वेग दिला आहे. या मार्गिकेचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर दुसरीकडे एमएमआरडीएने मंडाले कारशेडच्या कामालाही वेग दिला आहे. कारशेडचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर विद्युतीकरणाचे कामही पुर्ण झाले असून ८ एप्रिलपासून कारशेडमधील विद्युत प्रवाह सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
७२ मेट्रो गाड्या उभ्या करण्याची क्षमता
मंडाले येथे ३१.४ हेक्टर जागेवर मेट्रो २ ब मार्गिकेसाठी कारशेड बांधण्यात आले आहे. या कारशेडमध्ये आठ डब्यांच्या ७२ मेट्रो गाड्या एका वेळेला उभ्या करता येणार आहे. अधिकाधिक गाड्या उभ्या करता याव्यात यादृष्टीने कारशेडची रचना करण्यात आली आहे. अशा या कारशेडचे काम अंतिम टप्प्यात असून आता कारशेडमधील विद्युत प्रवाह सुरु होणार असल्याने ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात आहे. कारण विद्युत प्रवाह सुरु झाल्याने आणि कारशेड सज्ज होत असल्याने आता येत्या काही दिवसातच कारशेडमध्ये मेट्रो गाड्यांच्या चाचण्यांना आणि इतर चाचण्यांना सुरुवात केली जाणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे.