मुंबई : अंधेरी (पश्चिम) ते मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील महत्त्वाचा आणि आव्हानात्मक टप्पा अखेर नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यशस्वीपणे पूर्ण केला आहे. मेट्रो २ ब मार्गिका चेंबूरनाका येथे मोनोरेल मार्गिकेला ओलांडून पुढे जाणार आहे. तेव्हा मोनोरेल मार्गिका ओलांडून मेट्रो मार्गिका पुढे नेण्यासाठीच्या १५७ टनाच्या गर्डरची (तुळई) यशस्वी उभारणी करण्यात आली आहे.
एमएमआरडीएककडून मेट्रो २ ब चे काम सुरू असून डिसेंबर २०२४ मध्ये ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे एमएमआरडीएने कामाला वेग दिला आहे. अशात आता या कामातील अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक काम पूर्ण केले आहे. चेंबूरनाका येथील व्ही. एन. पुरव मार्ग येथून जाणाऱ्या मोनोरेल मार्गिकेला ओलांडून, मोनोरेल मार्गिकेवरून मेट्रो २ ब मार्गिका जाणार आहे. त्यासाठी मोनोरेल मार्गिकेवर गर्डर बसविणे आवश्यक होते. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री ते पहाटे पाच दरम्यान १५७ टन वजनाचा आणि २७ मीटर लांबीचा गर्डर बसविण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.
जमिनीपासून १८ मीटर उंच असा हा गर्डर ७५० टन वजनाच्या क्रेनच्या सहाय्याने बसविण्यात आला आहे. मेट्रो २ ब मार्गिकेतील अवघड काम पूर्ण झाल्याने आता काम आणखी वेग घेईल. आतापर्यंत या मार्गिकेचे ५० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. तेव्हा नियोजित वेळेत ही मार्गिका पूर्ण होईल, असा विश्वास यानिमित्ताने एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.