मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गिकेतील एक महत्त्वाचा टप्पा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) पार केला आहे. प्रकल्पातील भुयारीकरणाचा ४२ वा टप्पा बुधवारी पूर्ण झाला आहे. महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ८३७ मीटरचा हा ४२ वा टप्पा आहे. या कामाच्या अनुषंगाने प्रकल्पातील १०० टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
मेट्रो ३ प्रकल्प ३३.५ किमीचा असून यात एकूण ५५ किमीचे (येणारा-जाणारा मार्ग) भुयारीकरण करण्याचे आव्हान एमएमआरसीसमोर होते. हे आव्हान पेलण्यासाठी एमएमआरसीने अत्याधुनिक अशा टनेल बोिरग मशीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १७ टीबीएम मशीनचा वापर करण्यात आला आहे. २०१७ पासून एक एक करत १७ टीबीएम मशीन भूगर्भात सोडण्यात आले. भूगर्भातील ५५ किमीचे काम अखेर पाच वर्षांत या टीबीएमने यशस्वीपणे पूर्ण केले आहे. पहिले टीबीएम मशीन भुयारीकरण पूर्ण करून सप्टेंबर २०१८ मध्ये बाहेर आले. भुयारीकरणाचे ४२ टप्पे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी भुयारीकरणाचा शेवटचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे. पॅकेज ३ मधील महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतची ८३७ मीटरचा हा ४२ वा टप्पा होता. तानसा १ नावाच्या टीबीएमने ४३ दिवसांत हा टप्पा पूर्ण केला आहे. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला.
भुयारीकरणाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला असून याअनुषंगाने आता भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे, तर प्रकल्पाचे एकूण ७६.६ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली. मुंबईसारख्या वर्दळीच्या, जुन्या इमारती असलेल्या ठिकाणी काम करणे अत्यंत आव्हानात्मक होते. हे आव्हान यशस्वीपणे पेलले याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आता कामाला वेग देत निश्चित वेळेत मेट्रो ३ वाहतूक सेवेत दाखल करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.