मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होईल असे नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (‘एमएमआरसी’) जाहीर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी ४ ऑक्टोबरचा मुहूर्त धरण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आता ५ ऑक्टोबरची तारीख निश्चित झाल्याचे समजते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑक्टोबरवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी मुंबई आणि ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी ठाण्यात विविध विकास कार्यक्रमांचे लोकार्पण, भूमिपूजन करणार आहेत. तर वांद्रे – कुर्ला संकुल येथे ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करून भुयारी मेट्रोने प्रवास करतील, असे समजते. याच वेळी ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (‘एमएमआरसी’) पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – तामिळनाडूमधील कुख्यात गुंडाला मुंबईत अटक; हत्या, हत्येच्या प्रयत्नासारखे अनेक गुन्हे दाखल

‘एमएमआरसी’च्या ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या टप्प्यास सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. या अनुषंगाने पंतप्रधान मुंबई – ठाणे दौऱ्यावर असताना ५ ऑक्टोबर रोजी भुयारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

बीकेसी मेट्रो स्थानकावर लोकार्पणाचा सोहळा होणार असून या वेळी पंतप्रधान भुयारी मेट्रो प्रवास करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. आरे – बीकेसी टप्प्याबरोबरच बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा – मुंबई: हिंदमाताला जलवेढा कायम

असा आहे आरे ते बीकेसी पहिला टप्पा

‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३ मार्गिका’ संपूर्णतः भुयारी असून या मार्गिकेची लांबी ३३.५ किमी आहे. तर या मार्गिकेचा खर्च ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा १२.५ किमी लांबीचा असून या टप्प्यात दहा मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या टप्प्याच्या लोकार्पणानंतर मुंबईकरांना आरे – बीकेसी अंतर केवळ २२ मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र यासाठी त्यांना १० ते ५० रुपये मोजावे लागतील. कारण आरे – बीकेसी दरम्यानच्या प्रवासासाठी १० ते ५० रुपये असे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. या टप्प्यासाठी सध्या ‘एमएमआरसीएल’कडे १३ मेट्रो गाड्या सज्ज आहेत. मात्र १३ पैकी आरे – बीकेसीदरम्यान केवळ ९ मेट्रो गाड्या धावणार आहेत. दिवसाला भुयारी मेट्रो मार्गिकेवर मेट्रोच्या ९६ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक साडेसहा मिनिटांनी एक मेट्रो गाडी सुटणार आहे. वाहनचालक मुक्त अशा या अत्याधुनिक मेट्रो गाड्या असल्या तरी मेट्रो गाड्यांमध्ये मेट्रो पायलट अर्थात मेट्रो चालक उपस्थित असणार आहेत. सध्या पहिल्या टप्प्यासाठी ४८ मेट्रो पायलटची नियुक्तीकरण्यात आली आहे. यात १० महिला मेट्रो पायलटचा समावेश आहे. लोकार्पण झाल्यानंतर त्वरित आरे – बीकेसी टप्पा मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro 3 october 5th date for aarey bkc phase inauguration pm narendra modi will be present mumbai print news ssb