प्रवासादरम्यान मोबाईलचा वापर करता येईना
मुंबई…कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेवरील आरे ते बीकेसी मार्गिकेदरम्यान प्रवाशांना अखंडीत मोबाईल सेवा पुरविण्यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) एका त्रयस्थ खासगी कंपनीच्या माध्यमातून दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान केल्या जात आहेत. त्यानुसार मेट्रो ३ मार्गिकेवर एअरटेल, वोडाफोन कंपनीची नेटवर्क सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र आरे ते बीकेसी मेट्रो मार्गिका सेवेत दाखल होऊन सहा महिने झाले तरी अद्याप या मार्गिकेवर जिओचे नेटवर्क नाही. त्यामुळे जिओ कार्डधारकांना मेट्रो ३ मार्गिकेवर प्रवसा करताना ई तिकिट काढणे अशक्य होत आहे.
तर प्रवासादरम्यान मोबाईलवरुन कोणाशीही संभाषण साधता येत नसल्याचे चित्र आहे. त्यामळे जिओ कार्डधारक प्रवाशांची मेट्रो ३ प्रवासादरम्यान मोठी गैरसोय होत असून यासंबंधीच्या अनेक तक्रारी एमएमआरसीकडे येत आहेत. जिओची नेटवर्क सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एमएमआरसीकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे.
एमएमआरसीच्या ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गिका आॅक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. आरे ते बीकेसी आणि पुढे संपूर्ण आरे ते कफ परेड मार्गावर प्रवास करताना प्रवाशांना अखंडीत मोबाईल सेवा उपलब्ध व्हावी यासाठी एमएमआरसीने गेल्या वर्षी, मार्च २०२४ मध्ये सौदी अरेबियातील रियाध शहरातील एसीईएस या कंपनीच्या इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीशी करार केला आहे.
या करारानुसार या कंपनीच्या माध्यमातून मेट्रो ३ मार्गिकेत दूरसंचार पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार आरे ते बीकेसी मार्गिकेदरम्यान या कंपनीकडून एअरटेल, वोडाफोन आणि अन्यकाही मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क पुरविण्यात आले आहे. तर या कंपनीशी १२ वर्षांचा करार असून ही कंपनी आता पुढे बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यान आणि पुढे कफ परेड मेट्रो स्थानकापर्यंत दूरसंचार पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी या कंपनीवर आहे.
असे असताना मेट्रो ३ मार्गिकेवरील आरे ते बीकेसीदरम्यान अद्यापही जिओचे नेटवर्क नसल्याची माहिती एमएमआरसीमधील सुत्रांनी दिली. जिओचे नेटवर्क नसल्याने आम्हाला अनेक अडचणी येत आहेत, आमची गैरसोय होत आहे अशा अनेक तक्रारी प्रवाशांचा येत असल्याचेही सुत्रांनी सांगितले. त्याचवेळी जिओ कार्डधारक प्रवाशांची संख्या अधिक असताना त्यांना मेट्रो ३ मध्ये मोबाईल वापरता येत नसल्याने त्यांची नाराजी वाढत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
भुयारी मेट्रो स्थानकावर गेल्यास जिओचे नेटवर्क नसल्याने ई तिकिटऐवजी कागदी तिकीट प्रवाशांना खरेदी करावे लागते. तर प्रवासादरम्यान मोबाईलचा कोणताही वापर करता येत नसल्यानेही त्यांची गैरसोय होत आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रवासादरम्यान मोबाईल वापरता येत नसल्याने मेट्रो ३ कडे आयटीसह इतर क्षेत्रातील नोकरदार वर्ग वळत नसल्याचीही शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान जिओकडे नेटवर्क सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या त्रयस्थ कंपनीच्या माध्यमातून मेट्रो ३ मध्ये सेवा पुरविण्यास जिओ कंपनी तयार नसल्याने त्यांच्याकडुन सेवेसाठी टाळाटाळ केली जात असल्याचेही सुत्रांनी सांगितले. अशात आता बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकादरम्यानची मार्गिका लवकरच सेवेत दाखल होणार असताना यादरम्यानही जिओची सेवा उपलब्ध न झाल्यास काय असा प्रश्न एमएमआरसीसमोर उभा राहिला आहे. याविषयी जिओ कंपनीच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.