Metro 3 Updates : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ कधी सुरू होणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. मुंबईकर गेल्या अनेक महिन्यांपासून या मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पणाची वाट पाहत आहेत. दरम्यान, या मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून प्रमाणपत्र मिळालेलं नाही. हे प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेसाठी किमान एक – दीड महिन्यांचा कालावधी लागेल असं सांगितलं जात असतानाच भाजपा नेते आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी मेट्रो ३ चे लवकरच लोकार्पण होणार असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर केली होती. तसेच या मेट्रोच्या चाचणीचा व्हिडीओ देखील शेअर केला होता. मात्र काही तासांत त्यांनी हा व्हिडीओ डिलीट केला.
दरम्यान, आता इंडियन टेक अँड इन्फ्रा या एका व्हेरीफाईड एक्स अकाऊंटवरून एका भूयारी रेल्वेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यासह कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की बहुप्रतीक्षित मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचं (वांद्रे कुर्ला संकूल ते सीप्झ) आजपासून (२५ जुलै) परिचालन (Operations) सुरू झालं आहे. याबाबत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे विचारणा केली असता त्यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मेट्रो ३ बाबत अधिक माहितीसाठी एमएमआरसीएलशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून पुरेशी माहिती मिळाली नाही. त्यामुळे मुंबई मेट्रो ३ कधी सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी गेल्या आठवड्यात (बुधवार, १७ जुलै) एक्सवर एक पोस्ट केली. याद्वारे ‘मेट्रो ३’चे लोकार्पण होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. २४ जुलै रोजी मेट्रो ३ चं लोकर्पण होईल, अस त्यांनी म्हटलं होतं. मात्र काही वेळाने त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. त्यामुळे मेट्रो ३ चं लोकार्पण कधी करायचं याबाबत राज्यकर्ते आणि प्रशासनात ताळमेळ नसल्याची टीका होऊ लागली आहे.
हे ही वाचा >> Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे मंदावला विमानसेवेचा वेग, एअर इंडियाने केलं ‘हे’ आवाहन
मेट्रो ३ का खोळंबली?
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो ३’चे काम चालू आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्याचं एमएमआरसीएलने सांगितलं होतं. आता केवळ मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून चाचण्या करून घेणं बाकी आहे. ही प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास एक ते दीड महिने लागतील, त्यानंतर मेट्रोला हिरवा कंदील दाखवला जाईल.
© IE Online Media Services (P) Ltd