लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून काही ना काही तांत्रिक अडचणी येतच आहेत. या तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा वाहतूक सेवा विस्कळीत होत असून त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. तांत्रिक अडचणींची ही मालिका सुरूच असून वांद्रे शासकीय वसाहत मेट्रो स्थानकातील बी १ प्रवेशद्वार सोमवारी दिवसभर बंद होते. तांत्रिक अडचणींमुळे स्वयंचलित प्रवेशद्वार उघडलेच नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दुसर्या प्रवेशद्वाराचा वापर करावा लागला.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो’ मार्गिकाचे बांधकाम करीत आहे. या मार्गिकेतील १२.५ किमी लांबीच्या आरे – बीकेसी मार्गिकेचे लोकार्पण करून ही मार्गिका ७ ऑक्टोबरला वाहतूक सेवेत दाखल करण्यात आली. प्रवाशांकडून या मार्गिकेला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. या मार्गिकेवरील वाहतूक सेवा अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे विस्कळीत होत आहे. ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होऊन दोन दिवस होत नाहीतच तोच अचानक मेट्रो गाडी बंद पडली. ही गाडी एकाच ठिकाणी ३० मिनिटे थांबली होती. त्यामुळे वाहतूक सेवेवर त्याचा परिणाम झाला होता. या घटनेनंतर ११ ऑक्टोबर रोजी या टप्प्यातील एका मेट्रो स्थानकात मोठी गळती झाली. तर १० नोव्हेंबर रोजी रात्री अचानक दोन मेट्रो स्थानकांदरम्यान भुयारामध्येच मेट्रो गाडी बंद पडली होती. यामुळे प्रवाशांमध्ये भिती निर्माण झाली होती.

आणखी वाचा-निवडणूक रणधुमाळी संपताच शेतकऱ्यांना पहिला दणका; जाणून घ्या, गायीच्या दूध खरेदी दरातील नेमका बदल

आरे ते बीकेसी मार्गिकेतील तांत्रिक अडचणींची ही मालिका सुरूच आहे. सोमवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी वांद्रे शासकीय मेट्रो स्थानकातील चारपैकी एक बी १ प्रवेशद्वार उघडलेच नाही. तांत्रिक अडचणींमुळे स्वयंचलित प्रवेशद्वार न उघडल्याने प्रवाशांनी उर्वरित प्रवेशद्वाराचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. महत्त्वाचे म्हणजे हे प्रवेशद्वार दिवसभर बंद होते. एमएमआरसीने सोमवारी या प्रवेशद्वाराच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. हे काम पूर्ण होण्यास बराच वेळ लागला. बी १ प्रवेशद्वार मंगळवारी सकाळी उघडण्यात आल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबाबत एमएमआरसीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro 3 series of technical problems continue on aarey bkc route mumbai print news mrj