लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ३.४४२ किमी लांबीच्या ‘अंधेरी पूर्व – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ’ मार्गिकेवरील २.४९ किमी लांबीच्या दुहेरी भुयारी मार्गाच्या (बोगदा) कामाला १ सप्टेंबरपासून सुरुवात केली असून हे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर अंधेरी येथून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवघ्या काही मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे.
एमएमआरडीएच्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील दहिसर – गुंदवली, अंधेरी पूर्व ही महत्त्वाची मार्गिका आहे. ही मार्गिका सध्या वाहतूक सेवेत असून आता लवकरच या मार्गिकेचा ‘७ अ’ मार्गिकेच्या माध्यमातून विस्तार करण्यात येणार आहे. गुंदवली – आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी ही ३.४४२ किमी लांबीची ‘मेट्रो ७ अ’ मार्गिका आहे. या मार्गिकेत एयरपोर्ट कॉलनी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा केवळ दोनच मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. तर ३.४४२ किमीपैकी २.४९ किमी मार्गिका भुयारी आहे. या भूमीगत मार्गाच्या भुयारीकरणाच्या कामाला आता एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. टी ६२ टनल बोरिंग यंत्राच्या मदतीने शुक्रवारपासून भुयारीकरणाला सुरुवात झाली आहे. हे भुयारीकरण मे २०२४ मध्ये पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करून ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही मार्गिका सुरुवातीला उन्नत असणार असून पुढे शेवटपर्यंत भुयारी असणार आहे. भुयारी आणि उन्नत मेट्रोमधून प्रवास सुलभतेने व्हावा यासाठी जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे १२ ते २८ मीटर इतके खोल भुयारीकरण (बोगदा) करण्यात येणार आहे.
‘मेट्रो ७’च्या या विस्तारीत मार्गिकेमुळे गुंदवली, अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवास अवघ्या काही मिनिटात करणे शक्य होणार आहे. तर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीही दूर होणार आहे. ही मार्गिका अन्य मेट्रो मार्गिकांशी जोडली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईच्या कोणत्याही कोपऱ्यातून आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचणे सहज सोपे होणार आहे. ‘उत्तन – भाईंदर – मिरारोड – दहिसर मेट्रो ९’, ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’, ‘कुलाबा – वांद्रे – सीपझ मेट्रो ३’ या मार्गिकेांना ‘मेट्रो ७ अ’ मार्गिका जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ‘मेट्रो ७ अ’ मार्गिका अंत्यत महत्त्वाची मानली जात आहे.