मुंबई: ‘दहिसर – मिरा – भाईंदर मेट्रो ९’ मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या उत्तन येथील डोंगरी कारशेडला स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला असून या कारशेडसाठी १२ हजार ४०० झाडांची कत्तल करावी लागणार आहे. ही झाडे वाचविण्यासाठी रहिवासी सरसावले असून त्यांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत अंदाजे १५ हजार स्थानिक रहिवाशांनी झाडे वाचविण्यासाठी स्वक्षरी केली आहे. ही मोहीम रविवारपर्यंत सुरू राहणार असून मोहीम संपल्यानंतर स्वाक्षरी केलेले निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देऊन कारशेड अन्यत्र हलविण्याची मागणी करण्यात येणार आहे.
कारशेडवरून सुरुवातीपासून वाद
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मेट्रो ९’चे काम हाती घेतले आहे. ही मार्गिका शक्य तितक्या लवकर वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. मात्र या मार्गिकेतील कारशेड वादात अडकली आहे. मूळ प्रस्तावानुसार भाईंदरमधील राई, मुर्धा, मोर्वा या गावात कारशेड बांधण्यात येणार होती. मात्र या कारशेडला ग्रामस्थांनी कडाडून विरोध करीत आंदोलन उभे केले. परिणामी, राज्य सरकारने राई, मुर्धा, मोर्वामधील कारशेड रद्द करून डोंगरी येथे प्रस्तावित केली. त्यानुसार परवानगी देऊन जागेचा ताबा एमएमआरडीएला दिला.
मात्र आता या कारशेडलाही डोंगरी, उत्तनमधील, नव्हे तर संपूर्ण मिरा-भाईंदर शहरातील रहिवाशांनी विरोध केला आहे. मिरा-भाईंदरमधील एकमेव सर्वात मोठी मोकळी आणि हिरवळीची जागा असलेल्या डोंगरी जंगलात कारशेड बांधून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही कारशेड रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यातच एमएमआरडीएने मिरा-भाईंदर पालिकेकडे एकूण १२ हजार ४०० झाडांची कत्तल करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
कारशेडसाठी १२ हजार ४०० झाडे कापली जाणार असल्याचे समजताच ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर आता डोंगरी, उत्तन आणि आसपासच्या गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.
५० हजार स्वाक्षरींचे उद्दीष्ट
परिसर प्रभावित वेल्फेअर असोसिएनशच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार-पाच दिवसांपासून १२ हजार ४०० झाडे वाचविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. भाईंदर पूर्व-पश्चिम, मिरारोड पूर्व, नवी खाडी, गोराई, उत्तन टेकडी आदी भागात ही मोहीम राबविण्यात आली असून आता उर्वरित भागात ही मोहीम सुरू आहे. ही मोहीम रविवारपर्यंत सुरू राहील. या कालावधीत किमान ५० हजार स्वाक्षरींचे उद्दीष्ट आहे. आतापर्यंत १५ हजार स्वाक्षरी झाल्या आहेत. ५० हजार स्वाक्षरी झाल्यानंतर कारशेड रद्द करण्याची, १२ हजार ४०० झाडे वाचविण्याची मागणी करणारे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे परिसर प्रभावित वेल्फेअर असोसिएशनकडून सांगण्यात आले.