मुंबई : दहिसर पूर्व ते मीरारोड या मेट्रो ९ मार्गिकेतील राई, मुर्धा, मोर्वा गावातील कारशेड अखेर उत्तन येथे हलविण्यात येणार असल्याचे हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता ११.३८६ किमीची मेट्रो ९ मार्गिका आणखी चार किमीने विस्तारणार असून या मार्गिकेची धाव आता उत्तन येथील खोपरा गावापर्यंत असणार आहे. असे झाल्यास मुंबईकरांना मेट्रोने ‘एस्सेल वल्र्ड’ आणि ’पॅगोडा’ला जाणे सोपे होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अहवालानुसार कारशेड उत्तनला हलविणे अव्यवहार्य ठरविण्यात आले होते. त्यामुळे कारशेड राई, मुर्धा, मोर्वा गावातच होईल, असे एमएमआरडीएकडून अप्रत्यक्षपणे सांगण्यात येत होते. मात्र आता सरकारच्या घोषणेनंतर  कारशेड उत्तनला नेण्यासह मार्गिकेचा विस्तार उत्तनपर्यंत करणे अपरिहार्य ठरणार आहे. त्यानुसार लवकरच या दृष्टीने आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

सरकारच्या या घोषणेनंतर याविषयी ‘एमएमआरडीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता सरकारचा निर्णय असल्याने त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू होईल, असे स्पष्ट केले. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कारशेड उत्तनमधील खोपरा गावात हलविण्यासाठी ‘एमएमआरडीए’ला मेट्रो ९ मार्गिका चार किमीने विस्तारित करावी लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

अर्धी लढाई जिंकली..

राई, मुर्धा, मोर्वा कारशेडला येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. यासाठी जनआंदोलन उभे केले होते. मात्र आता कारशेड उत्तनला नेण्यात आल्याने  ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र आता केवळ अर्धी लढाई आम्ही जिंकली आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनाचे प्रमुख अशोक पाटील यांनी व्यक्त केली आहे.  राई, मुर्धा, मोर्वा गावातून जाणाऱ्या मार्गिकेचा मार्ग बदलावा अशीही मागणी आहे, असे ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro 9 route extended upto uttan zws