Mumbai Metro मुंबईतल्या बीकेसी मेट्रो स्टेशनला आग लागली आहे. या ठिकाणाहून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. अग्निशमन दलाचे १० ते १२ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचं वृत्त समजताच प्रशासनाकडून सर्व मेट्रो ऑपरेशन्स थांबवण्यात आले आहेत. त्यानंतर, मेट्रो ( Mumbai Metro ) स्टेशनमधील सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राउंड स्टेशन असून पहिल्यांदाच या ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मात्र, वेळीच सावधगिरी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी काय घटना घडली?

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील मेट्रो लाईन ३ च्या ( Mumbai Metro ) वांद्रे कुर्ला संकुल बीकेसी परिसरात आग लागल्याची घटना आज दुपारी १ वाजून ९ मिनिटांच्या सुमारास घडली या मेट्रो ( Mumbai Metro ) स्थानकाच्या बेसमेंटच्या भागात काम सुरू असताना ही आग लागली. ४०-५० फूट खाली आग लागली असून ह्या ठिकाणी मेट्रो स्थानकाचे काम सुरू होते १०० बाय ६० फूट च्या भागात हे काम सुरू होते या ठिकाणी लाकडं आणि इतर साहित्य असलेल्या भागात ही लागली.

अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले

जमिनीपासून ४०-५० फूट खाली आग लागल्याने मोठे धुराचे लोट हे स्थानकावर झाल्याची माहिती समोर आली त्यामुळे बीकेसी स्थानकावरील मेट्रोचा ( Mumbai Metro ) प्रवास तात्पुरता बंद करण्यात आला होता. आता तो सुरु करण्यात आला आहे. तसंच आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत आणि शर्यतीचे प्रयत्न करावे लागले आहेत. दुपारी अडीच वाजता सर्व बाजूने आग नियंत्रणात आल्याची माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. या आगीत वित्तहानी झाली आहे तर कोणतीही जीवितहानी नसल्याची ही माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

आरे-जोगेश्वरी- वांद्रे कॉलनी दरम्यानची इतर मेट्रो ( Mumbai Metro ) सेवा नेहमीप्रमाणे सुरू होती. मुंबई अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली असून एमएमआरसी आणि डीएमआरसीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. फायर ब्रिगेडने आग पूर्णपणे नियंत्रणात आणल्यानंतर आणि दुपारी २:४५ वाजता त्यांची परवानगी मिळाल्यानंतर बीकेसी स्थानकावरील सेवा पूर्ववत करण्यात आल्या. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असंही मेट्रोने म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro bkc station big fire all commuters were evacuated from underground scj