गोरेगावच्या ‘रॉयल पाम’मध्ये कारशेडची उभारणी; आरे, कांजूरमार्गला सरकारचा पर्याय
बहू चर्चित कुलाबा-वांद्रे-सीप्झ भुयारी मेट्रोसाठी कारशेडच्या जागेचा शोध लागला असून ही मेट्रो आता गोरेगावमधील रॉयल पाममध्ये स्थिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या आरेमधील प्रस्तावित कारशेडपासून दीड ते दोन किमी अंतरावर असलेली ही जागा कारशेडसाठी देण्याची तयारी विकासकाने दाखविली असून त्याबदल्यात विकासकास चटईक्षेत्र निर्देशांक देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पर्यावरणवाद्यांनीही या प्रस्तावास सहमती दर्शविली असल्याने महापालिकेच्या विकास आराखडय़ात त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा ३३.५ किलोमीटर लांबीचा आणि सुमारे २३ हजार कोटी रुपये खर्चाचा भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीतून स्थापन झालेल्या ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’मार्फत राबविला जात आहे. या मेट्रोसाठी प्रारंभी कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्याचा निर्णय झाला मात्र ती जागा न्यायप्रवीष्ठ असल्याचे आणि त्यावर खासगी विकासकांनी आपला हक्क सांगितल्याने नंतर आरे वसाहतीत कारशेड उभारण्याचा निर्णय झाला. त्याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. त्यानंतर शिवसेना आणि मनसेनेही त्यांना पाठबळ दिल्याने पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने मेट्रोची मुख्य कारशेड कांजूरमार्ग येथे तर आरेमध्ये छोटी कारशेड उभारावी, सीप्झ-कांजूर उन्नत मेट्रो मार्ग मेट्रो-३ मार्गालाच जोडावा, अशा शिफारशी समितीने केल्या होत्या.
समितीचा अहवाल स्वीकारत त्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर मेट्रो रेल कार्पोरेशनने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय करून तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला. मात्र आरे की कांजूरमार्ग यावरून सरकार द्वीधास्थितीत असतानाच रॉयल पाम या विकासकाने कारशेडसाठी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. या विकासकाच्या मालकाची आणि विकास आराखडय़ात ना विकास क्षेत्र म्हणून दर्शविण्यात आलेल्या सुमारे अडीचशे एकर जागेतील ६० एकर जागा देण्याची तयारी विकासकाने दर्शविली असून या जागेचा चटईक्षेत्र निर्देशांक द्यावा असा प्रस्ताव विकासकाने दिल्याचे समजते.
‘प्रश्न लवकरच मार्गी लागेल’
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असता, गोरेगावमध्येच कारशेडसाठी आणखी एका जागेचा पर्याय सरकारसमोर आला आहे. त्यामुळे झाडे वाचणार असून मुंबई महापालिका विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर कारशेडचा प्रश्न मार्गी लागेल असे फडणवीस यांनी सांगितले. ना विकास क्षेत्रात कारशेड करण्यास अडचण येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.