मुंबई मेट्रोचं कारशेड कुठे असावं? यावरून तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पार्टीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांजूरमार्गऐवजी ‘आरे जंगला’त मेट्रो कारशेड होईल, असा निर्णय घेतला. यावरून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात वादाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयानंतर अनेक पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत ‘आरे बचाव’ आंदोलनही केलं.
या सर्व घडामोडींनंतर मागील काही दिवसांपासून सुरू असलेला कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या भूखंडाचा वाद आता मिटला आहे. त्यामुळे आरे जंगलातच मेट्रो कारशेड होणार हे पक्कं झालं आहे. २०२० मध्ये आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. ठाकरे सरकारचा हा आदेश आता शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आला आहे. उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
हेही वाचा- नाशिक : महानुभाव संमेलनात खडसे-फडणवीस एकाच मंचावर, खडसेंच्या भाषणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
कांजूरमार्ग येथील जागेवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये सुरू असलेला वाद आता मिटला आहे. कांजूरमार्ग येथील जागा मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला देण्याचा आदेश महाविकास आघाडी सरकारने दिला होता. १ ऑक्टोबर २०२० रोजी ही जागा हस्तांतरित करण्यात आली होती. या जागेवरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वादाला सुरुवात झाली होती. राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर या जागेवरील कारशेडच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिली होती.