मुंबई मेट्रो मार्गाच्या बांधकामात अंधेरी रेल्वेस्थानकावरील मेट्रोचा पूल आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोग उड्डाणपुलावरील मेट्रोचा पूल ही दोन कामे सर्वात आव्हानात्मक ठरली आहेत. सोमवारी जोग उड्डाणपुलावरील केबलवर आधारित मेट्रो पूलवरून पहिल्यांदाच मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यावेळी वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ते एअरपोर्ट रोड मेट्रो स्थानक अशा सात किलोमीटर अंतरावर ही चाचणी घेण्यात आली, त्यावेळी अंधेरीकरांना पहिल्यांदाच केबल पुलावरून धावणारी मेट्रो पाहण्याचा अनुभव घेता आला.
ही तांत्रिक चाचणी होती. या प्रवासात कुठेही धक्के बसले नाहीत आणि केबल पुलावरून जाण्य़ाची अनुभव सुखदायक होता. हा मेट्रोमार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत प्रवासासाठी खुला केला जाईल अशी आम्हाला खात्री आहे, असं एमएमआरडीएचे अतिरिक्त मेट्रोपोलिटन आयुक्त एसवीआर. श्रीनिवास म्हणाले.
पहिल्या टप्प्यासाठी आणखी काही तांत्रिक चाचण्या घेण्यात येणार आहेत. आम्ही आता घाटकोपरपर्यंतच्या दुस-या टप्प्याचे काम संपवण्याच्य़ा प्रयत्नात आहोत, असंही श्रीनिवास म्हणाले. दुसरा टप्पा हा डिसेंबर पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.  
एकूण ११.४ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाची बांधणी रिलायन्स इन्स्फ्रास्ट्रक्चर-लेड मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) तर्फे करण्यात येत असून सोमवारच्या चाणणीला कंपनीच्या अधिका-यांसह मेट्रोपोलिटन आयुक्त यूपीएस मदल हे देखिल उपस्थित होते.
सोमवारी संध्याकाळी सहा वाजता वर्सोवा स्थानकावरून चाचणीला सुरूवात झाली. बांधकामाची भक्कमता आणि सर्व तांत्रिक बाबींच्या तपासणीसाठी मेट्रोचा वेग ७७ किलोमीटर प्रतितास इतक्या सर्वाधिक वेगापर्यंत नेण्यात आला होता.  
वांद्रे-वरळी सागरी सेतूनंतर अंधेरी येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जोग उड्डाणपुलावरील १८५ मीटर लांबीचा हा मुंबईतील दूसरा केबल पूल आहे. शहरातील अतिशय वर्दळीच्या जंक्शनवर जमिनीपासून २१ मीटर उंचीवर त्याची उभारणी करण्यात आली आहे. बांधकामासाठी रखडलेला हा संपूर्ण आशिया खंडातील पहिला मेट्रो पूल आहे. दूसरा पूल हा अंधेरी रेल्वेस्थानकावरील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आहे.    
फेब्रुवारी २००८ साली सुरू झालेल्या मुंबई मेट्रोच्या ११.४० किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी केवळ पहिल्या तीन किलोमीटरच्या टप्प्यातच वर्सोवा ते आझादनगर स्थानकापर्यंत चाचणी १ मे रोजी घेण्यात आली होती.