पर्यावरणीय प्रभाव अहवाल आणि मंजुरीसाठी सल्लागाराच्या नियुक्तीसाठी एमएमआरडीएकडून निविदा
मुंबई : मुंबई आणि बदलापूरला मेट्रोने जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिका प्रस्तावित केली असून ३८ किमीची ही मार्गिका आता लवकरच मार्गी लागणार आहे. मेट्रो १४ मार्गिकेच्या पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करण्यासह वन आणि पर्यावरणासंबंधीची मंजुरी घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
सल्लागाराच्या नियुक्तीसाठी बुधवारी एमएमआरडीएकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सल्लागाराची नियुक्ती आणि पुढील कार्यवाही करून वर्षभरात मेट्रो १४ मार्गिकेच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, मिरा-भाईंदर, ठाणेवासियांपाठोपाठ बदलापूरवासियांचेही मेट्रोचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल.
एमएमआरडीएच्या ३३७ किमीच्या मेट्रो मार्गिकेतील १४ मेट्रो मार्गिकेचे काम केव्हा सुरु होणार याची प्रतीक्षा बदलापूरवासियांना होती. कारण ही मेट्रो मार्गिका थेट मुंबई आणि बदलापूरला जोडणार आहे. त्यामुळे ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यास दीड ते दोन तासांचा प्रवास काही मिनिटांत होणार असल्याने ही मार्गिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
आता ही मार्गिका प्रत्यक्षात मार्गी लावण्याच्यासाठी एमएमआरडीएने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो १४ मार्गिकेसाठी मिलान मेट्रो या कंपनीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या अहवालास आयआयटी मुंबईची मान्यताही मिळाली आहे. आता येत्या काही दिवसांतच हा अहवाल अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारने अहवालास मान्यता दिल्यास प्रत्यक्ष बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
आता या मार्गिकेचा पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करण्यासह पर्यावरण-वन विभागाची मंजुरी घेण्याच्या कामास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी बुधवारी निविदा प्रसिद्ध केली आहे.
मेट्रो १४ मार्गिका ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्य प्रभाव क्षेत्रातून जाणार आहे. त्यामुळे या मार्गिकेसाठी पर्यावरणीय प्रभाव अहवाल तयार करण्यासह पर्यावरण आणि वन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार आता या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यासाठी एमएमआरडीएकडून येत्या काही महिन्यांत सल्लागाराची निुयक्ती केली जाणार आहे.
एकूणच पर्यावरणीय प्रभाव अहवाल, पर्यावरणासंबंधीची परवानगी घेणे, सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण करून वर्षभरात मेट्रो १४ मार्गिकेच्या कामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे असेल. एकूणच मेट्रो १४ मार्गिकाही आता लवकरच मार्गी लागेल.
अशी आहे मेट्रो १४ मार्गिका
कांजूरमार्ग ते बदलापूर मार्गिका
३९ किमी लांबी
१५ स्थानके
कांजूरमार्ग ते घणसोलीदरम्यान भुयारी मेट्रो मार्गिका
घणसोली ते बदलापूर उन्नत मेट्रो मार्गिका
अपेक्षित खर्च १८ हजार कोटी रुपये
एकूण मार्गिकेपैकी ४.३८ किमीची मार्गिका पारसिक हिल भागातून जाणार
तर ५.७ किमीचा मार्गिकेचा भाग ठाणे खाडी परिसरातून जाणार