तर बदलापूर, विरारवासियांचे मेट्रोचे स्वप्नही लवकरच पूर्ण

मुंबई...ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेवरील मेट्रोची धाव आता कल्याणऐवजी उल्हासनगरपर्यंत असणार आहे. कारण मेट्रो ५ मार्गिकेचा आता खडकपाडा ते उल्हासनगर असा विस्तार होणार आहे. मुंबई महानगर प्रेदश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२४-२५ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पानुसार मेट्रो ५ च्या कल्याण-खडकपाडा आणि खडकपाडा-उल्हासनगर अशा अंदाजे ७.७ किमीच्या विस्तारीत मार्गिकेच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

दुसरीकडे गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो १०, शिवाजी चौक ते विरार मेट्रो १३ आणि कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकांच्या कामासही चालू वर्षात सुरुवात करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यामुळे आता लवकरच उल्हासनगर, बदलापूर आणि विरारवासियांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएकडून ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जात आहे. या ३३७ किमीच्या मेट्रो जाळ्यातील मेट्रो १०, १३ आणि १४ मार्गिकेच्या कामास सुरुवात होण्याची प्रतीक्षा होती. या तिन्ही मेट्रो मार्गिका एमएमआरच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या होत्या. अखेर एमएमआरडीएने या तिन्ही मेट्रो मार्गिकांच्या कामाला चालू वर्षात सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात त्यासाठीची तरतूद करण्यात आली आहे.

अंदाजे ९.२९ किमीच्या गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो १०, अंदाजे २३ किमीच्या शिवाजी चौक ते विरार मेट्रो १३ आणि कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकांच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आता तातडीने कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे. त्याचवेळी दुसरीकडे मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात यासंबंधीची तरतूद करून या विस्तारीकरणाच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात येणार आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिका २४.९ किमी लांबीची आणि साडेआठ हजार कोटी खर्चाची मार्गिका आहे. १७ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेली ही मार्गिका ठाण्यावरुन सुरु होऊन कल्याणला येऊन संपणार आहे. या मार्गिकेचे दोन टप्प्यात काम करण्यात येत असून पहिल्या ठाणे-भिवंडी टप्प्याचे काम वेगाने पुढे जात आहे. लवकरच भिवंडी ते ठाणे टप्प्यातील कामाला सुरुवात होणार आहे. अशात आता मेट्रो ५ मार्गिका कल्याणपर्यंत नव्हे तर थेट उल्हासनगरपर्यंत धावणार आहे. कारण या मार्गिकेचा विस्तार कल्याण, खडकपाडा ते उल्हासनगर असा करण्यात येणार आहे.

शुक्रवारी अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता उल्हासनगर, विरार, बदलापूर हा परिसरही मेट्रोने जोडला जाणार आहे. दरम्यान अर्थसंकल्पात मेट्रोसह अनेक पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करत एमएमआरडीएने एमएमआरच्या भविष्याचा आराखडा मांडला असल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली.

अर्थसंकल्पातील एमएमआरसाठीच्या तरतुदी

मिरा भाईंदर महानगर पालिका क्षेत्रातील कामे :-

सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन पर्यंत रस्ता तयार करणे.

घोडबंदर- जैसलपार्क ६० मीटर ३० मीटर रुंदीचा रस्ता तयार करणे

राष्ट्रीय महामार्ग समांतर घोडबंदर साई पॅलेस ते ठाकुर मॉलपर्यंत ३० मीटर रुंदीचा रस्ता तयार करणे.

मिरारोड पूर्व व पश्चिम यांना जोडणारा रेल्वेवरील उड्डाणपूल व रस्ता बांधणे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कामे :-

ठाणे येथील ओवळा माजिवाडा मतदारसंघातील विविध रस्त्यांचे बांधकाम (२३ रस्ते)

वसई विरार क्षेत्रातील कामे :-

वसई विरार क्षेत्रातील रस्ते, खाडीवरील पुल व रेल्वे उड्डाणपुलांची कामे.

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील ४ प्रमुख शहरे व सभोवतालच्या गावांना जोडणारा ४०मी. रुंदीचा रिंगरोड विकसित करणे.

वसई विरार शहर महानगर पालिका हद्दीतील ५ रेल्वे ओव्हर ब्रिज कामांचे बांधकाम.

रायगड जिल्हाअंतर्गत अलिबाग तालुक्यातील रस्त्यांची कामे:-

रायगड जिल्हाअंतर्गत अलिबाग तालुक्यातील ३ पॅकेज मधील रस्त्यांची कामे

कुळगांव बदलापूर नगरपरिषद :-

कुळगांव बदलापूर क्षेत्रामध्ये कात्रप ते बेलावली बदलापूर दरम्यान आरओबी बांधणे कात्रप पेट्रोल पंप ते खरवई जुवेली (बदलापूर बायपास – भाग-२) पर्यंत सीसी रस्त्याचे बांधकाम