लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले या ५.३९ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यातील मेट्रो गाड्यांसह इतर यंत्रणांच्या चाचण्यांना (ट्रायल रन) बुधवारी सुरुवात झाली. या चाचण्यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच हार्बर मार्गिकेवर डायमंड गार्डन – मंडाले दरम्यान मेट्रो धावली. आता या मार्गिकेवर दररोज चाचण्या होणार असून चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र घेऊन डिसेंबरअखेरपर्यंत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे. तर ‘मेट्रो २ ब’मधील पहिल्या टप्प्याचे संचलन सुरू झाल्यास हार्बरवासियांना प्रवासासाठी पहिली मेट्रो मार्गिका उपलब्ध होणार आहे.

दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिका ‘मेट्रो २ ब’च्या माध्यमातून पुढे मंडालेपर्यंत नेण्यात आली आहे. २३ किमी लांबीच्या आणि २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मेट्रो मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. डायमंड गार्डन – मंडाले आणि डायमंड गार्डन – अंधेरी पश्चिम असे दोन टप्पे आहेत. या मार्गिकेसाठी मंडाले येथे कारशेड उभारण्यात आली आहे. या कारशेडमधील विद्युत प्रवाहन ८ एप्रिल रोजी सुरू झाल्याने एमएमआरडीएने बुधवार, १६ एप्रिलपासून डायमंड गार्डन – मंडाले या पहिल्या टप्प्यातील मेट्रो गाड्यांसह इतर यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळपासून चाचण्यांना सुरुवात झाली. डायमंड गार्डन – मंडाले दरम्यान पहिल्यांदाच मेट्रो धावली.

पहिल्या टप्प्याचे ९८ टक्के काम पूर्ण

हार्बर मार्गिकेवरील ही मेट्रो वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन या ठिकाणी जाणे सोपे होणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या चाचण्यांना सुरुवात होणे ही आनंदाची बाब मानली जात आहे. मात्र डायमंड गार्डन – मंडाले दरम्यान मेट्रो प्रवास करण्यासाठी प्रवाशांना डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण पहिल्या टप्प्याचे आतापर्यंत ९८ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. तर मंडाले येथील ३१ एकर जागेवर उभारण्यात येत असलेल्या ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील मंडाले कारशेडचेही ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे.

उर्वरित कामे पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र घेऊन मेट्रो २ मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचे संचलन करण्यासाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डायमंड गार्डन – मंडाले असा मेट्र प्रवास करण्यासाठी डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण हार्बरवासियांना पहिली मेट्रो उपलब्ध होणार असल्याने ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

येथे जाणे होणार सोपे

व्ही. एन. पुरव मार्ग आणि शीव-पनवेल महामार्ग येथे जाणाऱ्यांना ‘मेट्रो २ ब’च्या पहिल्या टप्प्याचा फायदा होणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेत १५ ते २० मिनिटांची बचत होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. हा पहिला टप्पा हार्बर मार्गिकेवरील मानखुर्द रेल्वे स्थानकाला जोडला जाणार आहे. त्यामुळे मानखुर्द रेल्वे स्थानकावर पोहचणे सोपे होणार आहे. तसेच ही मार्गिका मंडाळे येथून ‘मुंबई विमानतळ – नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८’ला जोडली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात थेट नवी मुंबईला जाणे सोपे होणार आहे.