आणखी चार गाड्या लवकरच आरे कारशेडमध्ये येणार
लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: भविष्यात ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवर धावणारी चौथी आणि पाचवी मेट्रो गाडी गुरुवारी आंध्र प्रदेशातील श्री सिटीतून मुंबईमधील आरे कारशेडमध्ये दाखल असून मुंबईत दाखल झालेल्या मेट्रो गाड्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसीदरम्यान एकूण नऊ गाड्यांची आवश्यकता आहे. आता पाच गाड्या सज्ज असून उर्वरित चार गाड्यांची प्रतीक्षा आहे. या चार गाड्या लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) युद्धपातळीवर ‘मेट्रो ३’चे काम हाती घेतले आहे. ३३.५ किमी लांबीची ही मार्गिका दोन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बीकेसी – आरेदरम्यान डिसेंबर २०२३ मध्ये, तर दुसऱ्या टप्प्यात बीकेसी – कफ परेडदरम्यान जून २०२४ मध्ये वाहतूक सेवा सुरू करण्याचा एमएमआरसीचा मानस आहे.
हेही वाचा… मुंबई: अल्पवयीन मुलीवर वडील आणि प्रियकराकडून लैंगिक अत्याचार
सध्या एकीकडे पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू असून दुसरीकडे मेट्रो गाड्या मुंबईत आणून त्यांची चाचणी घेण्याच्या कामालाही वेग देण्यात आला आहे. त्यानुसार दोन मेट्रो गाड्या गुरुवारी श्री सिटीवरून आरे कारशेडमध्ये दाखल झाल्या. याआधी तीन गाड्या मुंबईत आल्या असून त्यांची नियमित चाचणी सुरू आहे. आता मुंबईत दाखल झालेल्या गाड्यांची संख्या एकूण पाचवर पोहोचली आहे, अशी माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
हेही वाचा… मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी; अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या गाड्यांची चाचणी सुरू होणार आहे. दारम्यान, पहिल्या टप्प्यासाठी एकूण नऊ गाड्या आवश्यक असून आता केवळ चार गाड्या येणे बाकी आहे. या चार गाड्या लवकरच येतील आणि पहिला टप्पा डिसेंबरमध्ये वाहतूक सेवेत दाखल होईल, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला.