मुंबई : नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना मेट्रोची सेवा उपलब्ध असणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरापर्यंत, साडे बारा वाजेपर्यंत मेट्रो सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांवर अतिरिक्त १४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे आता शेवटची मेट्रो रात्री १०.३० ऐवजी रात्री १२.३० वाजता सोडण्यात येणार आहे. अंधेरी पश्चिम आणि गुंदवलीवरून रात्री १२.३० वाजता शेवटची मेट्रो सुटणार आहे. दरम्यान, ही सेवा केवळ नवरात्रोत्सवानिमित्त १९ ते २३ ऑक्टोबरदरम्यान असणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक, अनेक लोकल गाड्या रद्द; ‘असा’ करा प्रवास
१९ ते २३ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीत सुमारे १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रोच्या एकूण १४ अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५.५५ ते रात्री १०.३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या फेऱ्या होतात. साडेसात ते साडेदहा मिनिटांच्या अंतराने या दोन्ही मार्गिकेवर मेट्रो धावतात. तर शनिवारी २३८ आणि रविवार २०५ फेऱ्या मेट्रोच्या होतात. या दोन्ही दिवशी आठ ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावतात. नवरात्रोत्सवात १९ ते २३ ऑक्टोबरदरम्यान नियमित सेवांनंतर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रोच्या १४ अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे या अतिरिक्त सेवांच्या कालावधीत मेट्रो २ अ वरील अंधेरी (पश्चिम) आणि मेट्रो ७ वरील गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो ही रात्री १.३० वाजता पोहचेल. अतिरिक्त फेऱ्यानुसार कामाच्या दिवशी मेट्रोच्या २६७ फेऱ्या तर सुट्टीच्या दिवशी मेट्रोच्या २५२ फेऱ्या होतील.