वर्षांनुवर्षे रखडलेल्या वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर मुंबईची पहिली मेट्रो रेल्वे कधी धावणार हे अद्यापही अनिश्चित असताना आता या मार्गाखाली फुलांचा ताटवा फुलविण्यासाठी ठेवण्यात आलेल्या जागेचे रूपांतर उकिरडय़ात होण्यास सुरुवात झाली आहे. कंत्राटदारांनी अंधेरी-कुर्ला टप्प्यातील मेट्रो मार्गाखालील जागेवर दगड-माती आणि इतर बांधकाम साहित्याचा राडारोडा टाकणे सुरूच राहिल्याने या जागेचे रूपांतर डम्पिंग मैदानात झाले आहे. या अस्वच्छतेचा त्रास परिसरातील लोकांना होत आहे.
वसरेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो रेल्वे मार्गाची एकूण लांबी ११.४० किलोमीटर आहे. या मेट्रो मार्गावर वसरेवा, डी. एन. नगर, आझाद नगर, अंधेरी, पश्चिम द्रुतगती मार्ग, चकाला, एअरपोर्ट रोड, मरोळनाका, साकीनाका, सुभाष नगर, असल्फा रोड आणि घाटकोपर अशी १२ स्थानके आहेत. या मेट्रो मार्गाखाली असलेल्या जागेवर दोन खांबांच्या मध्ये फुलांचा ताटवा फुलवून मेट्रो मार्ग सुशोभित करण्याची योजना आहे.
फुलझाडे-हिरवळ लावण्यासाठी असलेल्या जागेवर आता सर्रास  दगड-माती, सिमेंट असा बांधकामाचा राडारोडा (डेब्रिस) येऊन पडत आहे. अंधेरी-कुर्ला रस्त्यावर प्रामुख्याने हे चित्र आहे. त्यामुळे मेट्रो मार्गाच्या खालचा भाग म्हणजे डम्पिंग मैदान असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकही येता-जाता कचरा टाकत आहेत. मुळात मेट्रोचे काम रखडल्याने या मार्गालगतचे रहिवासी आधीच त्रस्त झालेले आहेत. तशात या डेब्रिसमुळे परिसर अस्वच्छ होण्यास सुरुवात झाली आहे.
कुल्र्यातील रहिवासी संघटनांनी ऐन रस्त्यावरील या उकिरडय़ाविरोधात मुंबई मेट्रोचे काम करत असलेल्या ‘मुंबई मेट्रोवन प्रा. लि.’सह या प्रकल्पास जबाबदार असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे गेल्या काही महिन्यांपासून वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत
आहे.
आधीचे मेट्रोच्या खांबांचे खड्डे व त्यामुळे उखडलेले रस्त्यांचा जाच अनुभवल्यानंतर आता मेट्रो मार्गाच्या खालच्या भागात डेब्रिसचा उकिरडय़ांचा त्रास सहन करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा