मुंबई : मुलुंड पूर्व भागात जी.व्ही. स्कीम मार्गावर रस्त्याचे खोदकाम सुरू असताना गुरुवारी महानगर गॅस वाहिनीला धक्का लागला. त्यावेळी महानगर गॅसचे अभियंते घटनास्थळी हजर होते आणि त्यांनी परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. सुरक्षेसाठी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. या दुर्घटनेमुळे या परिसरातील गॅस पुरवठा बराचकाळ बंद ठेवावा लागला.

संपूर्ण मुंबईत सध्या रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. संपूर्ण मुंबईत मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच प्रदूषणातही भर पडली आहे. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी रस्ते खोदकाम करत असताना जलवाहिन्या, गॅसवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना या रस्ते कामांमुळे मोठ्या गैरसोयींना तोंड द्यावे लागते आहे. मुलुंडमधील नागरिकांनाही गुरुवारी असाच अनुभव आला.

पूर्व उपनगरात आणि मुलुंड परिसरात रस्त्यांची एका कंत्राटदाराला देण्यात आली असून या कंत्राटदाराची कामे अत्यंत निष्काळजीपणे सुरू आहेत. या कामामुळे गुरुवारी महानगर गॅस वाहिनी फुटली. याबाबत मुलुंडमधील सामाजिक कार्यकर्ते सागर देवरे यांनी सांगितले की, रस्त्याचे काम जेथे सुरू आहे तेथे महानगर गॅसच्यावतीने रस्ते कंत्राटदाराला कामगार सहाय्य देण्यात आले आहे. मात्र महानगर गॅस अभियंता जेवणाच्या वेळेत बाहेर गेलेला असताना कंत्राटदाराने पुन्हा खोदकाम सुरू केले व तेव्हाच गॅस वाहिनी फुटली. यामध्ये मोठी दुर्घटना टळली असली तरी अनेक ठिकाणी गॅस पुरवठा खंडित झाला.

मुलुंडमध्ये रस्त्याचे काम ज्या कंत्राटदाराला दिले आहे त्याचे काम अत्यंत निष्काळजीपणे सुरू असून यापूर्वीही त्यांच्या कामगारांच्या निष्काळजीपणामुळे पाणी आणि विजेच्या वाहिन्यांसह आवश्यक सुविधांचे नुकसान केल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, असा आरोप देवरे यांनी केला आहे. मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे हाती घेतल्यामुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. ठिकठिकाणी सुरू असलेली कामे, अर्धवट सोडून दिलेली कामे, ठिकठिकाणी राडोरोडा, बॅरिकेड्स नसणे, उखडले रस्ते, तुटलेले पदपथ यामुळे परिसर अतिशय बकाल झालेला आहे. या कामांमुळे प्रदूषणात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे.सदर कंत्राटदार प्रदूषण नियंत्रण संदर्भात सुद्धा कोणत्याही प्रकारची खबरदारी घेताना आढळून येत नाही, असाही आरोप येथील रहिवासी करीत असून रस्ता नको पण गैरसोय आवर असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.

Story img Loader