मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबईमधील म्हाडाच्या घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला सुरुवात करण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न असून मुंबई मंडळ आता सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी करीत आहे. महिन्याभरात जाहिरात प्रसिद्ध करून ऑगस्टपासून अर्ज विक्री – स्वीकृतीला सुरुवात करण्याचा मंडळाचा विचार आहे. सुमारे दोन हजार घरांचा सोडतीत समावेश करण्यात येणार असून मागील सोडतीतील मुंबई शहरातील शिल्लक घरांसह गोरेगाव, दिंडोशी, मालाड, कोपरी (पवई), कन्नमवार नगर (विक्रोळी) आदी ठिकाणच्या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे २०२३ ची सोडत अत्यल्प आणि अल्प गटासाठी होती. तर आगामी सोडत अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी असणार आहे. यावेळी अत्यल्प गटासाठी कमी घरे असण्याची शक्यता आहे. कोपरी, पवईतील निर्माणाधीन उच्च आणि मध्यम गटातील ४२६ आणि पहाडी गोरेगावमधील पंचतारांकित प्रकल्पातील ३३२ (मध्यम आणि उच्च) घरांचाही सोडतीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा या गटातील इच्छुकांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा – नवीन कायद्याअंतर्गत राज्यभरात २४४ गुन्हे दाखल

मुंबई मंडळातील घरांना सर्वाधिक मागणी असते. मुंबईतील घरांची २०२० ते २०२२ या काळात सोडत काढण्यात आली नव्हती. २०१९ नंतर थेट २०२३ मध्ये ४०८२ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. यावर्षीही सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार आता घरांची शोधाशोध पूर्ण करून मंडळाने त्यांच्या किंमती निश्चित करण्याच्या कामाला वेग दिला आहे. येत्या आठवड्याभरात किंमती अंतिम करून जाहिरात प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. ऑगस्टमध्ये अर्ज विक्री – नोंदणीला सुरुवात करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. मंडळाच्या प्रस्तावानुसार २०२४ मध्ये सुमारे दोन हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याला मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दुजोरा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सोडतीत अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठीची घरे अधिक, तर अत्यल्प गटासाठी कमी घरे असणार आहेत. ऑगस्ट २०२३ च्या सोडतीतील अंदाजे ५०० घरे शिल्लक राहिली असून या घरांचा आगामी सोडतीत समावेश करण्यात आला आहे. शिल्लक घरांसह नवीन तयार घरांची संख्या कमी असल्याने मंडळाने सोडतीतील घरांची संख्या वाढविण्यासाठी उच्च आणि मध्यम गटातील कोपरी, पवई आणि गोरेगाव, पहाडीतील निर्माणाधीन प्रकल्पांतील घरांचाही त्यात समावेश केला आहे.

पवई तलावापासून नजिक असलेल्या कोपरीमध्ये ४२६ घरांचा प्रकल्प आहे. यातील ३३३ घरे मध्यम गटातील असून ९३ घरे उच्च गटातील आहेत. तर गोरेगाव पहाडीत उच्च गटातील २२७ घरांसह मध्यम गटातील १०५ अशा एकूण ३३२ घरांचा प्रकल्प आहे. कोपरीतील प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबरमध्ये या घरांना निवासी दाखला मिळण्याची शक्यता आहे. गोरेगावमधील घरांचे ६५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून काम पूर्ण होऊन मार्च २०२५ मध्ये या घरांना निवासी दाखला मिळण्याची शक्यता आहे. या दोन प्रकल्पातील घरांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा दावा मंडळाने केला आहे. सोडतीमध्ये कोपरी आणि पहाडीतील घरांसह कन्नमवार नगरमधील अल्प आणि मध्यम गटांतील घरांचा समावेश आहे. तर २०२३ मधील शिल्लक अत्यल्प आणि अल्प गटातील काही घरेही सोडतीत असणार आहेत. त्याचवेळी २०२३ मधील गोरेगावमधील पीएमएवायमधील शिल्लक ८८ घरेही सोडतीत समाविष्ट असतील. याशिवाय दिंडोशी, मालाडसह ताडदेवमधील साडेसात कोटींच्या शिल्लक घरांचाही समावेश असेल.

हेही वाचा – शुक्रे आयोगाला प्रतिवादी करायचे की नाही यावरून वाद, मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांतच मतभेद

काही घरांची माहिती

● कोपरी, पवई – मध्यम – ३३३ -७०० ते ८००चौ. फुट – १ कोटी २५ लाख रुपये

● कोपरी, पवई – उच्च – ९३ -९८० चौ. फुट – १ कोटी ६० लाख रुपये

● कन्नमवारनगर, विक्रोळी – मध्यम गट – ८६ – ६५० चौ. फुट – ७० ते ७२ लाख रुपये

● कन्नमवारनगर, विक्रोळी – अल्प – ८६ -४७३ चौ.फुट – ४० लाख रुपये

● कन्नमवारनगर, विक्रोळी – अल्प – ८८ – ५८५ – किंमत ५० लाख रुपये

● गोरेगाव,पहाडी -मध्यम – १०५ – ७९४.३१ चौ फूट – १ कोटी ७ लाख ५ हजार रुपये

● गोरेगाव, पहाडी – उच्च – २२७ – ९७९.५८ चौ फूट – १ कोटी २५ लाख ९१ हजार रुपये

● खडकपाडा – अल्प – ८७ – ४४.६१ चौ.मी. – ६४ लाख १२ हजार ५८४ रुपये

● खडकपाडा-अल्प- ४६-५९.९१ चौ.मी.-८६ लाख ११ हजार ९२३ रुपये

● मालाड, शिवधाम-अल्प-४५-४४.२० चौ,मी. -५४ लाख ९१ हजार रुपये

● मालाड शिवधाम- अल्प-२०- ५८ चौ,मी.-७२ लाख रुपये

● मालाड शिवधाम-अल्प-२३- ५८.९३ चौ.मी.-७३ लाख २२ हजार रुपये

● मालाड शिवधाम-मध्यम-१- ६४ चौ.मी.-९० लाख ४७ हजार रुपये

● गोरेगाव, पीएमएवाय-अत्यल्प-८८-३२२ चौ.फूट-३३ लाख २००० रुपये