पहिल्या टप्प्यात भाडेपट्टा करारनाम्यासह पुनर्विकासाच्या प्रस्तावांना संगणकीय पद्धतीने मुदतवाढ देणार
मुंबई : म्हाडाचा संपूर्ण कारभार संगणकीय, कागदविरहित (पेपरलेस) करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता. आता या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यानुसार ई ऑफिस प्रणालीअंतर्गत म्हाडातील सर्व सेवांचे लवकरच संगणकीकरण केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने हे संगणकीकरण केले जाणार असून पहिल्या टप्प्यात जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावास मुदतवाढ देण्याची वा ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया संगणकीय पद्धतीने राबविली जाणार आहे. तर मुंबई मंडळातील भूखंडांच्या भाडेपट्टा करारनाम्यांचे नूतनीकरण संगणकीय पद्धतीने केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेवांचे संगणकीकरण करण्याच्या कामाला लवकरच म्हाडाच्या संबंधित विभागाकडून सुरुवात केली जाणार आहे. एकूणच या संगणकीकरणामुळे लवकरच म्हाडाचा कारभार कागदविरहीत होणार आहे.
म्हाडाकडून गृहप्रकल्प राबविण्यासह सोडतीद्वारे सर्वसामान्यांना घरांचे वितरण केले जाते. तर जुन्या इमारतींचा, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास केला जातो. तर इतर अनेक सेवा पुरविल्या जातात. या सर्व कामांसाठी म्हाडा लाभार्थ्यांसह इतर नागरिकांना म्हाडा भवनासह राज्यभरातील विविध विभागीय मंडळामध्ये यावे लागते. काळानुरूप कारभार संगणकीय करण्याचा निर्णय यापूर्वीच म्हाडाने घेतला होता. त्यानुसार आधी सोडतपूर्व आणि सोडत प्रक्रिया संगणकीय करण्यात आली, तर दीड वर्षांपूर्वीच सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रियाही संगणकीय करण्यात आली आहे. संपूर्ण सोडत प्रक्रिया संगणकीय झाल्याने मानवी हस्तक्षेप दूर झाला असून सोडतीत पारदर्शकता आल्याचे म्हटले जात आहे. सर्वसाधारण सोडतीसह बृहतसूचीवरील घरांची सोडतही आता संगणकीय करण्यात आली आहे. आता म्हाडातील सर्व सेवांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार टप्प्याटप्प्याने सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील सेवांच्या संगणकीकरणाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाअंतर्गत जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांना मुदतवाढ देण्याची, तसेच प्रस्तावांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. तर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रस्तावांनाही यापुढे संगणकीय पद्धतीनेच मान्यता दिली जाणार आहे. तसेच भूखंड भाडेपट्टा करारनामा, काररानाम्यांचे नूतनीकरणही ई ऑफिस प्रणालीद्वारे केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात इतर सेवांचे संगणकीकरण केले जाणार आहे. एकूण येत्या काही महिन्यात म्हाडाचा कारभार कागदविरहीत आणि संगणकीय होणार आहे.