मुंबई : म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. ही ४९३ घरे २० टक्के सर्वसमावेश योजनेतील असून या घरांच्या सोडतीसाठीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस शुक्रवारी (७ फेब्रुवारी) दुपारी २.३० वाजता सुरुवात झाली.इच्छुकांना या घरांसाठी ७ मार्चपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार आहेत. दरम्यान मंडळाने सोडतीचे वेळापत्रक जाहीर करून अर्जविक्री-स्वीकृती सुरू केली आहे. मात्र असे असले तरी प्रत्यक्ष सोडतीची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

विकासकांकडून नाशिक मंडळाला २० टक्के योजनेतील घरे देण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र तरीही म्हाडा प्राधिकरण आणि नाशिक मंडळ ही घरे मिळविण्यासाठी सातत्याने नाशिक महानगरपालिकेसह विकासकांकडे पाठपुरावा करीत आहे. या पाठपुराव्यामुळे नाशिक मंडळाला नुकतीच २० टक्क्यातील ४९३ घरे उपलब्ध झाली. या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून शुक्रवारपासून (७ फेब्रुवारी) नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात करण्यात आली आहे.

नाशिक मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते दुपारी २.३० वाजता अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे आता २० टक्के योजनेतील या घरांसाठी इच्छुकांना अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार अर्ज भरण्याची मुदत ६ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे. तर संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम अदा करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात येणार आहे. आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम अदा करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ७ मार्च रोजी दुपारी ४ पर्यंत आहे. ७ मार्च रोजी अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात येईल आणि १८ मार्च रोजी पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सोडत काढणे अपेक्षित आहे. मात्र नाशिक मंडळाने अद्याप सोडतीची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे अर्जदारांना सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या सोडतीत मखमलाबाद शिवार येथील अवध युटोपिया प्रकल्पातील ७० घरे अत्यल्प उत्पन्न गटातील असून २९.९७ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या या घराच्या किंमती १२ लाख ७३ हजार ९८५ ते १७ लाख ४७ हजार ३३६ रुपये अशा आहेत. तर सातपूर शिवार, मखमलाबाद शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार यासह अन्य काही ठिकाणची घरे अल्प गटातील आहेत. या घरांच्या किंमती १३ लाख ते २५ लाखांदरम्यानच्या आहेत. त्याचवेळी गणेश आरंभ, मौजे पिंपळगाव, बहुला शिवारमधील ७० घरांसह अन्य ठिकाणच्या २०२ घरांचा समावेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत करण्यात आला आहे. त्यामुळे १४ ते २३ लाख रुपयांदरम्यान किंमती असलेल्या या घरांसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नसून प्रथम अर्ज करणाऱ्या पात्र अर्जदाराला घराचे वितरण करण्यात येणार आहे. एकाच वेळी एकापेक्षा अधिक घरे प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत नाशिककरांना विकत घेता येणार आहेत.

Story img Loader