मुंबई : वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांची घरे रिकामी करून घेण्यासाठी मुंबई मंडळाने आता घरभाड्याचा पर्याय निवडला आहे. पात्र रहिवाशांना महिना २५ हजार रुपये घरभाडे देण्यात येणार आहे. आता ११ महिन्यांचे एकत्रित घरभाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसऱ्या वर्षाचेही ११ महिन्यांचे घरभाडे एकत्रित देण्याचे म्हाडाने जाहीर केले आहे.
बीडीडी चाळीचा रखडलेला पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार सध्या वरळी, ना. म. जोशी मार्ग या तीन बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम मुंबई मंडळाकडून सुरू आहे. टप्प्याटप्प्यात इमारती रिकाम्या करून इमारतींचे पाडकाम करत त्यावर उत्तुंग इमारती बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान रहिवाशांची पात्रता निश्चित करून त्यांना सोडतीद्वारे पुनर्वसित इमारतीतील घराची हमी देत घरे रिकामी करून घेतली जात आहेत. या पात्र रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन म्हाडाच्या संक्रमण शिबिरात केले जात आहे. पण आता मुंबई मंडळाकडे संक्रमण शिबिरातील गाळेच नाहीत. त्यामुळे मंडळाने आता घरभाडे देत घरे रिकामी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र रहिवाशांना दरमहा २५ हजार रुपये असे घरभाडे दिले जाणार आहे.
हेही वाचा…मंगळसूत्राबाबतचे कथानक खरे होते का? उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना सवाल
या निर्णयाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात केली जाणार आहे. २५ हजार रुपये घरभाडे देत घरे रिकामी करून घेतली जाणार आहेत. दरम्यान एका महिन्याचे घरभाडे देण्याऐवजी वर्षाचे एकत्रित घरभाडे द्यावे अशी रहिवाशांची मागणी होती. त्यानुसार ११ महिन्यांचे एकत्रित तर दुसऱ्या वर्षांचेही ११ महिन्याचे घरभाडे एकत्रित देण्याचा प्रस्ताव मुंबई मंडळाकडून म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार दोन वर्षांनंतर रहिवाशांना आणखी किती महिने भाड्याच्या घरात रहावे लागणार आहे त्याचा कालावधी लक्षात घेता त्या कालावधीचे घरभाडे एकत्रित दिले जाणार आहे. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे म्हाडा प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.